Untitled 1

अजपा साधनेची दहा सोपी व्हेरीएशन्स 

मानवी स्वभावाचे एक वैशिष्ठ्य असे की त्याला एक गोष्ट बराच काळ केली की तिचा कंटाळा येऊ लागतो. योगसाधना सुद्धा त्याला अपवाद नाही. विशेषतः ध्यानात्मक साधना ह्या काहीशा passive असल्याने बऱ्याच साधकांना काही महिन्यांच्या अभ्यासानंतर त्या कंटाळवाण्या वाटू लागता. याचा परिणाम असा होतो की साधना यांत्रिक बनते आणि साधक ती सोडून देण्याची शक्यता बळावते. आपली योगसाधना ताजी टवटवीत कशी ठेवायची हे सुद्धा एक कसब आहे. प्रत्येकाने त्या बाबतीत थोडी कल्पकता जोपासण्याची गरज आहे ज्याद्वारे साधनेच्या मूळ उद्दिष्टात बदल न घडता त्यात नाविन्य टिकून राहील.

येथे मी अजपा साधनेची अशीच दहा सोप्पी व्हेरीएशन्स देत आहे ज्यांचा तुम्हाला नक्की उपयोग होईल अशी आशा आहे. मी असं गृहीत धरतो आहे की तुम्हाला अजपाची बेसिक टेकनिक अवगत आहे आणि तिचा नित्य सराव तुम्ही करत आहात. चला तर सुरवात करू या.

१. जप माळेवरील अजपा

अजपा ही श्वासांवर आधारित साधना असल्याने अजपाच्या मूळ विधानात जप माळेचा उपयोग केला जात नाही. परंतु तुम्ही "हंसात्मक" श्वास जपमाळेवर मोजू शकता. हा प्रकार विशेषतः नवख्या साधकांसाठी उपयुक्त आहे. जप माळ वापरताना माळेचे मणी बोटाने फिरवावे लागतात. त्यामुळे अजपात श्वासांबरोबरच अजून एका शारीरिक क्रियेचा समावेश होतो. परिणामी मनाची भरकटण्याची जी सवय असते ती कमी होण्यास मदत होते.

२. दीर्घ श्वसना सहित अजपा

मूळ अजपा विधानात नैसर्गिक श्वासांवर सोहं किंवा हंस मंत्राच्या अनुषंगाने जाणीव ठेवली जाते. नैसर्गिक श्वसन हे बहुतांशी वेळा उदरश्वसन (abdominal breathing) या प्रकारात मोडते. या व्हेरीएशन मध्ये तुम्हाला दीर्घ श्वास (Sssoooo...)  आणि दीर्घ उच्छ्वास (Hhhmmm...) यांचा अवलंब करायचा आहे. हे करत असतांना उदरश्वसन न होता ते छातीच्या मार्फत होईल (thoracic breathing). तणावमुक्ती साठी हा प्रकार instant प्रभाव दाखवतो.

३. सोहं / हंस मंत्राची अदलाबदल करून अजपा

सामान्यतः अजपा करतेवेळी तुम्ही एकतर "सोहं" मंत्र वापरत असणार किंवा "हंस" मंत्र. जो मंत्र वापरत असाल त्याची अदलाबदल करायची. म्हणजे असं की जर तुम्ही रोज "सोहं" वापरत असाल तर आता "हंस" वापरायचा आणि जर "हंस" वापरत असाल तर "सोहं" वापरायचा. ही अदलाबदल करत असतांना श्वासा बरोबर काय आणि उच्छवासा बरोबर काय ते अचूक करायला विसरू नका.

४. इष्टमंत्रा सहित अजपा

तुम्ही जो मंत्र इष्टमंत्र म्हणून वापरत असाल त्याचा जप तुम्ही श्वास आणि उच्छ्वासा बरोबर करू शकता. याचा अर्थ असा की या व्हेरीएशन मध्ये "सोहं" किंवा "हंस" न वापरता तुम्ही तुमचा इष्टमंत्राचा वापर करणार आहात. एकदा श्वासाबरोबर आणि एकदा उच्छ्वासाबरोबर असा दोन वेळा इष्टमंत्राचा जप घडेल. तुमचा इष्टमंत्र जर कमी अक्षरांनी बनलेला असेल तर ही प्रक्रिया अधिक सुलभपणे करता येते. इष्टमंत्र जर खुप मोठा असेल त्याला दोन भागात तोडा. श्वासांबरोबर पहिला भाग आणि उच्छवासा बरोबर दुसरा भाग वापरा.

५. सुखमय त्रिबंधा सहित अजपा

मूळ अजपा विधानात मुद्दाम कोणतेही हठयोगोक्त बंध लावले जात नाहीत. परंतु या व्हेरीएशन मध्ये तुम्ही त्यांचा चपलखपणे वापर करू शकता. करायचं असं की श्वास घ्यायला सुरवात केली की हलकेच मूलबंध लावायचा. करकचून लावायचा नाही. सुखमय वाटेल इतपतच लावायचा. श्वास दीर्घ घ्यायचा (आधी सांगितल्या प्रमाणे) जेणेकरून श्वास पूर्ण घेतला की पोट आपसूकच थोडं आत ओढलं जाईल. त्या स्थितील मग हलकेच उड्डीयान बंध लावायचा. फार जोरात लावायचा नाही. हे करत असतांनाच तुमची मान पुढे झुकलेली असेल जेणेकरून हलका जालंधर बंध लागेल.आ प्रक्रियेतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या तीन बंधांचे synchronization. ते एकदा बरोबर जमू लागले की मजा येते हे व्हेरीएशन करायला. एका प्रयत्नात नाही साधणार. करून बघा थोडे दिवस मग जमू लागेल.

६. कुंभका सहित अजपा

हे व्हेरीएशन सुद्धा अगदी छान आणि उपयुक्त आहे. एका दीर्घ "सो" सहित श्वास आत घ्यायचा आणि तो लगेच बाहेर न टाकता आंतर कुंभक लावायचा. सुखमय कुंभक झाल्यावर दीर्घ उच्छ्वास सोडायचा. या व्हेरीएशन मुळे फुफुसांना चांगला प्रसरण आणि आकुंचन स्वरूपात व्यायाम मिळतो. कुंभकाचा अंतर्भाव केलेला असल्याने मन लवकर स्थिर होते. मनाची चंचलता नाहीशी व्हायला मदत होते. हा प्रकार तुम्ही बाह्य कुंभकासहित सुद्धा करू शकता परंतु आंतर कुंभका सहित तो जास्त उपयुक्त आहे.

७. हस्तमुद्रां सहित अजपा

अजपा मूळ विधान करत असतांना तुम्ही त्या जोडीला हस्त मुद्रा धारण करू शकता. हस्त मुद्रा अनेकानेक आहेत. त्यांतील ज्ञानमुद्रा, ध्यानमुद्रा, प्राणमुद्रा वगैरे ध्यानाला आणि प्राणमय कोषाला पोषक असलेल्या मुद्रा या कामी अधिक उपयुक्त आहेत. ह्या मुद्रा तुमच्या शारीरिक प्रकृती नुसार निवडाव्या लागतात. त्यामुळे येथे मी विशिष्ठ असा क्रम किंवा संच देत नाही. कफ-वात-पित्त यांनुसार तुम्ही स्वतःसाठी ठरवू शकाल. समजा तुम्ही २१ मिनिटे अजपा साधना करत आहात तर सात मुद्रा तीन-तीन मिनिटे किंवा पाच मुद्रा चार-चार मिनिटे किंवा तीन मुद्रा सात-सात मिनिटे असा तो संच बसवा. अर्थात हा मानीतकमी वेळ सांगितला. अधिक देता आला तर उत्तमच.

८. सुषुम्ना ध्याना सहित अजपा

हे एक अत्यंत प्रभावी आणि अद्भूत असं व्हेरीएशन आहे. यामध्ये श्वास "सो" सहित घेत असतांना मेरुदंडामधून जाणाऱ्या सुषुम्ना नाडीवर लुलाधार ते सहस्रार या दिशेने "धावते" ध्यान केले जाते. श्वास सोडत असतांना "हं" सहित उलट दिशेने म्हणजे सहस्रार ते मुलाधार असे सुषुम्ना ध्यान करावे. थोड्या सरावानंतर सुषुम्नेतील तेजस्वी कुंडलिनी शक्तीचे सुद्धा ध्यान तुम्ही करू शकाल. सुरवातीला हे ध्यान थोडं जड वाटेल पण थोड्या दिवसांच्या सरावानंतर सहज जमू लागेल.

९. शांभवी आणि खेचरी मुद्रे सहित अजपा

अजपा साधनेत धारणा असते ती प्रामुख्याने येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांची. परंतु अजपा एकदा का नीट जमू लागली की तुम्ही धारणेचे केंद्र बदलू शकता. या कामी भ्रूमध्य स्थानावर अर्थात आज्ञाचक्रावर कार्य करणारी भगवान शंकर स्वतः जी धारण करतो ती शांभवी मुद्रा अत्यंत उपयुक्त आहे. जीभ उलटी करून नभोमुद्रेत किंवा खेचरी मुद्रेत ठेवायची. मन सोहं / हंस आणि भ्रूमध्यावर घट्ट लावून धरायचे. या व्हेरीएशन ची थोरवी शब्दात वर्णन करता येणार नाही. पूर्णार्थाने साधायला जरा कठीण आहे पण सुरवातीच्या पायऱ्या सरावाने जमू लागतील.

१०. षण्मुखी मुद्रे सहित अजपा

या व्हेरीएशन मध्ये षण्मुखी मुद्रा लावली जाते आणि मग अजपाचे मूळ विधान करायचे. षण्मुखी करतांना सर्वसाधारणपणे नाकपुड्या पूर्ण बंद केल्या जातात. तसं नाही करायचं. नाकपुड्या अलगद थोड्या दाबून धरायच्या. या प्रक्रियेत शांभवी आणि खेचरीचा अंतर्भाव सुद्धा करू शकता. ते जमलं नाही तर "आत्मज्योती" वर विधीपूर्वक ध्यान करू शकता.

बघा. म्हणता म्हणता मी तुम्हाला दहा सोप्पी व्हेरीएशन्स सांगितली. अजूनही आहेत पण विस्तारभयास्तव आज देत नाही. आता तुम्हीच सांगा की अजपा ध्यान कंटाळवाणे का बरं होईल? गरज आहे फक्त थोडी इच्छाशक्ती लावण्याची. मग बघा अजपा गायत्री तुम्हाला कसं भरभरून अध्यात्मसुख देईल ते.

असो.

अजपा जपाचे मूळ कारण म्हणजे आदिशक्ती जगदंबा कुंडलिनी. सर्व योगाभ्यासी वाचकांवर तिचा वरदहस्त राहो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 13 April 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates