Untitled 1

प्राचीन योगग्रंथांतील डाएट प्लान्स

आजकाल डाएट आणि डाएट प्लान हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. गरज असो किंवा नसो आपण कोणतातरी डाएट प्लान फॉलो करणे आवश्यक आहे अशी मानसिकता वाढत आहे. एखाद्या विशिष्ठ डाएट प्लान विषयी उहापोह करणे हा या लेखाचा उद्देश नाही. आज जे डाएट प्लान लोकप्रिय झाले आहेत त्यांचा प्राचीन योगग्रंथांत काही उल्लेख सापडतो आहे का ते जाणून घेणे एवढाच या लेखाचा उद्देश आहे.

आज लोकप्रिय असणाऱ्या विविध डाएट प्लान्स कडे नजर टाकली तर ढोबळमानाने खालील दोन डाएट प्लान्स अधिक लोकप्रिय झाले आहेत असे आपल्याला आढळते:

१. दिवसातून दोन वेळा पोटभर आहार घेणे

२. दिवसातून सहा ते आठ वेळा अल्प प्रमाणात आहार घेणे

आयुर्वेदाचे जे प्राचीन साहित्य आहे त्यात अर्थातच आहार विषयक विवेचन विस्ताराने सांगितलेले आहे. कुंडलिनी योग विषयक ग्रंथांमध्येही आहार-विहारावर कमी-अधिक प्रमाणात विवेचन आलेले आहे. प्राचीन योगी हे केवळ योगविद्येचे ज्ञाते नव्हते तर त्त्यांना जडी-बुटी, वनौषधी आणि त्या अनुषंगाने आयुर्वेदाचा गाढा अभ्यासही होता. कुंडलिनी योग विषयक प्राचीन योगाग्रंथांत तो जागोजागी प्रकट झालेला आहे.

पुढे जाण्यापूर्वी येथे एक महत्वाची गोष्ट अवश्य सांगायला हवी. प्राचीन योग ग्रंथांतील आहार विषयक जे विवेचन आहे ते प्रामुख्याने प्राणायामाच्या अभ्यासाशी निगडीत आहे. त्याचं कारण हे की कुंडलिनी जागृतीमध्ये प्राणायाम आणि विशेषतः कुंभकयुक्त प्राणायाम महत्वाची भूमिका बजावतो. पंचकोशांपैकी अन्नमय कोष, प्राणमय कोष आणि मनोमय कोष यांचा एकमेकाशी घनिष्ठ संबंध आहे. त्यातही हठयोगाच्या आणि कुंडलिनी योगाच्या दृष्टीने प्राणमय कोषाचे अनन्यसाधारण महत्व आहे. जोवर प्राणमय कोष प्रस्फुटीत होत नाही तोवर कुंडलिनी जागरण संभव होत नाही अशी हठयोगाची आणि कुंडलिनी योगाची भूमिका आहे. प्राणमय कोष प्रस्फुटीत करण्यासाठी प्राणायाम साधना अत्यावश्यक मानली गेली आहे. जवळजवळ सर्वच प्राचीन कुंडलिनी योग ग्रंथांनी स्पष्टोक्ती केलेली आहे की जर आहार-विहाराचे नियम पाळले नाहीत तर प्राणायामाच्या साधनेत पूर्ण सफलता मिळणे अशक्यप्राय आहे. तोच धागा पकडून मग ते ग्रंथ योगमार्गी आहाराचे विवेचन करतात. त्यासंबंधींचा खालील श्लोक पुरेसा बोलका आहे.

मिताहारं विना यस्तु योगरम्भं तु कारयेत् ।
नानारोगो भवेत्तस्य किञ्चिद्योगो न सिध्यति ॥

याचा थोडक्यात अर्थ असा की मिताहाराचा अवलंब केल्याशिवाय योगाभ्यासाला सुरवात करू नये. मिताहार न केल्यास साधकाला नाना प्रकारचे रोग होण्याचा धोका असतो आणि योग अजिबात साधत नाही.

आता मिताहार म्हणजे काय त्यासंबंधीचे दोन श्लोक पाहू.

शुद्धं सुमधुरं स्निग्धं उदरार्धविवर्जितम् ।
भुज्यते सुरसं प्रीत्या मिताहरमिमं विदुः ॥
अन्नेन पूरयेदर्धं तोयेन तु तृतीयकम् ।
उदरस्य तृतीयाशं संरक्षेद् वायुचारणे ॥

योग्याने कशा प्रकारचे अन्न खावे तर शुद्ध, सुमधुर आणि स्निग्ध असे सात्विक अन्न पदार्थ खावेत. हे अन्न रुचकर असावे आणि ईश्वरा प्रीत्यर्थ ग्रहण करावे. किती अन्न खावे? उदर पोकळीचे चार भाग कल्पून त्यांतील दोन अन्नाने भरावेत, तिसरा भाग पाण्यासाठी आणि उरलेला चौथा भाग वायू साठी मोकळा ठेवावा.

योग्यांची मिताहाराची व्याख्या काय ते आपण पाहिलं. आता वरील दोन आहार प्रणालींविषयी जाणून घेऊ. आता गंमत अशी आहे की प्राचीन योगग्रंथांत वरील दोनही आहार प्रणालींचा उल्लेख सापडतो. अमुक एकच अवलंबावी किंवा अमुक एकच श्रेष्ठ आहे असा वाद आढळत नाही. प्रथम "दिवसातून दोन वेळा" पद्धातीविषयक योगग्रंथ काय म्हणतात ते पाहू.

प्रतःस्नानोपवासादि कायक्लेशविधिं तथा ।
एकाहारं निराहारं यामान्ते च न कारयेत् ।
एवं विधिविधानेन प्राणायामं समाचरेत् ।
आरम्भे प्रथमे कुर्यात् क्षीराज्यं नित्यभोजनम् ।
मध्याह्ने चैव सायाह्ने भोजनद्वयमाचरेत् ।
 

योग्याने प्रातःकाळी स्नान करण्याचा अट्टाहास करू नये. उपवासादी गोष्टी करू नयेत किंवा शरीराला त्रासदायक ठरतील अशा गोष्टी करू नयेत. त्याचप्रमाणे एकभुक्त रहाणे किंवा निराहार रहाणे किंवा तीन तासांच्या आत परत-परत खाणे अशा गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. हे नियम पाळून साधकाने प्राणायामाचा अभ्यास करायला सुरवात करावी. सुरवातीच्या काळी आहारात दुध आणि तूप यांचा वापर करावा. योग्याने दिवसातून दोन वेळा भोजन करावे. एकदा मध्यान्ह काळी आणि दुसऱ्यांदा सायंकाळी.

योग ग्रंथांतील वरील विवेचन पुरेसे बोलके आणि उद्बोधक आहे. आता "दिवसातून अनेक वेळा" आहार प्रणाली विषयी योगग्रंथ काय म्हणतात ते पाहू.

अभ्यासकाले प्रथमं कुर्यात क्षीराज्य भोजनम ।
ततोभ्यासे स्थिरी भुते न तादृढनियमग्रह ।
अभ्यासिना च भोक्तव्यं स्तोकम स्तोकनेकथा ।
पूर्वोक्त काले कुर्यातु कुम्भकान प्रतिवासरम ।
 

येथेही सुरवातीला दुध आणि तूप मिश्रित आहार घेण्याचा सल्ला दिलेला आहे. अभ्यासाने शरीरातील प्राण जोवर स्थिर होत नाही तोवर हा नियम पाळणे अपेक्षित आहे. एकदा प्राणशक्तीला स्थिरता आणि दृढता आली की मग हा नियम शिथिल केला तरी हरकत नाही असे स्पष्टीकरण येथे दिलेले आहे. प्राणायामाच्या बाबतीत योगशास्त्रात "स्थिरता" या शब्दाला विशिष्ठ आणि सुस्पष्ट असा अर्थ आहे. प्राणायामाच्या अभ्यासाच्या तीन अवस्था आहेत. प्रथम अवस्थेत शरीराला हलका-हलका घाम येतो. दुसऱ्या अवस्थेत शरीतात कंपने जाणवतात. या दोन अवस्था पार केल्यानंतर तिसऱ्या अवस्थेत प्राण स्थिरावस्था प्राप्त करतो. तेंव्हा ही तिसरी अवस्था जोवर प्राप्त होत नाही तोवर आहाराचे नियम पाळावेत असं येथे सांगितलं आहे. योगाभ्यासी साधकाने भोजन किंवा अन्नग्रहण कसं करावं तर थोडं-थोडं अनेकवेळा खावं. येथे हे लक्षात घेतलं पाहिजे की अन्नाची मात्रा वाढवायची नाहीये. तेवढेच अन्न एकावेळी न खाता अनेकवेळा छोट्या-छोट्या भागांमध्ये विभागून ग्रहण करायचे आहे. असा आहार घेत असतांना साधकाने विधिवत कुंभक युक्त प्राणायाम करायचे आहेत.

वरील विवेचना वरून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे या दोन्ही आहारप्रणाली योगशास्त्र संमत आहेत. साधकाने आपली आहारप्रणाली निवडताना एक फॅड म्हणून न निवडता आपापली शरीरप्रकृती पाहून निवडावी. गरज भासल्यास दोन्ही प्रणालींचा अवलंब काही महिने करून पहावा आणि कोणती जास्त उपयुक्त आहे ते प्रत्यक्ष पहावे.

असो.

ब्रह्मतत्वाकडे वाटचाल करत असतांना "अन्न हे पूर्णब्रह्म" हे लक्षात घेऊन योगाभ्यासी वाचक उदरभरणरुपी "यज्ञकर्म" करोत ह्या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 06 January 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates