Untitled 1

योगसाधनेतून आनंदाचा D.O.S.E.

अनादी कालापासून मानवी जीवनात आनंदाची प्राप्ती हे प्रमुख उद्दिष्ठ राहिले आहे. भौतिक सुखांपासून प्राप्त होणारा आनंद अशाश्वत असतो हे ओळखून प्राचीन काळच्या योग्यांनी शाश्वत आनंद किंवा सत-चित-आनंद हे अंतिम ध्येय निश्चित केले आहे. सामान्य योगसाधकाला शाश्वत आनंदाची संकल्पना बुद्धीच्या स्तरावर जरी समजली तरी ती प्रत्यक्षात अनुभवायला त्याला अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो. मुख्य म्हणजे शाश्वत आनंदाचा उपभोग घेण्यासाठी स्वतःला तयार करावे लागते. या तयारीचा एक टप्पा म्हणून त्याला मानवी पिंडाच्या आनंदाची पाळेमुळे कशात आहेत त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. योगशास्त्रात त्या संदर्भात विस्ताराने मार्गदर्शन आहेच परंतु आजच्या आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत त्याकडे कशाप्रकारे पाहिले जाते ते थोडक्यात समजावून घेणे उद्बोधक ठरावे.

तुम्ही जर इंटरनेटवर हेल्थ, फिटनेस, वेल बीइंग वगैरे विषयांवर वाचन करत असाल तर "Happiness Hormones" हा शब्द कदाचित तुमच्या परिचयाचा असेल. हे Happiness Hormones म्हणजे नक्को काय प्रकरण आहे आणि त्यांचा योगसाधनेशी काय संबंध आहे हे आज थोडक्यात जाणून घेऊ या. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगितली पाहिजे की येथे देत असलेली माहिती केवळ या विषयाची तोंडओळख आहे. विस्ताराने सखोल माहिती देणे हा या लेखाचा उद्देश नाही. तेंव्हा त्याच दृष्टीने त्याकडे पहा.

ज्या प्रमाणे प्राचीन काळी योगीजन शाश्वत आनंदाच्या शोधात मग्न होते तसेच आधुनिक विज्ञान सुद्धा या विषयाचा सखोल अभ्यास करत आहे. प्राचीन काळच्या योग्यांना त्यावर उत्तर मिळाले आणि त्यांनी ते अष्टांग योगशास्त्राच्या मार्गाने प्रसारित आणि प्रचारित केले. आधुनिक विज्ञानाला जरी अजून संपूर्ण उत्तर मिळालेले नसले तरी "आनंदाच्या कोड्यातील" काही अंश सोडवण्यात त्यांना यश आलेले आहे. त्यांतीलच एक भाग म्हणजे वर उल्लेखलेले Happiness Hormones. सर्वसामान्य भाषेत तरी लोकं त्यांना हॉर्मोन्स म्हणत असले तरी प्रत्यक्षात त्यांना रसायने म्हणजे अधिक योग्य ठरेल. आधुनिक विज्ञानाने असा शोध लावलेला आहे की माणसाचा आनंद आणि एकूणच मानसिक स्थिती मेंदूच्या आज्ञेद्वारे स्रवणाऱ्या काही रसायनांवर अवलंबून असते. त्यांतील महवाची रसायने म्हणजे डोपामिन (Dopamine), ऑक्सीटोसिन (Oxytocin), सेरोटोनिन (Serotonin), आणि एंडोर्फिन (Endorphins). या चार रसायनांच्या समूहाला संक्षेपाने D.O.S.E. असं म्हटलं जातं. आता गंमत बघा. आनंद हा मनाचा एक भाव पण त्याला किती विविध छटा असतात. तश्याच छटा या चार रसायनांच्या गुणधर्मांमध्ये आहेत. या पैकी प्रत्येकाचे कार्य थोडक्यात जाणून घेऊ या.

डोपामिन हे रसायन छोड्या-छोट्या आणि क्षणिक गोष्टींमधून मिळणाऱ्या आनंदाला कारणीभूत आहे. डोपामिन पासून मिळणाऱ्या आनंदाची काही उदाहरणे पाहू. सोशल मिडीयावर तुम्ही तुम्ही एखादा फोटो टाकता आणि त्याला तुम्हाला बरेच लाईक मिळतात. त्यावेळी तुम्हाला जो आनंद होतो तो डोपामिन मुळे होत असतो. जेवणात एखादा आवडीचा पदार्थ खायला मिळाला किंवा एखादं आवडीचं गाणं ऐकलं की जो आनंद होतो तो सुद्धा डोपामिन मुळे. नवीन मोबाईल आणल्यावर तो वापरतांना जो आनंद होतो तो सुद्धा डोपामिन मुळे. शॉपिंग मॉल मध्ये मनसोक्त खरेदी करतांना मनाला जो आनंद होतो तो सुद्धा डोपामिन मुळेच. या डोपामिनचं एक वैशिष्ठ आहे. तो आपल्याला चांगल्या अथवा वाईट अशा सवयींत जखडून ठेऊ शकतो. त्याच्या या गुणधर्मामुळेच आजकाल तरुण मंडळींमध्ये सोशल मिडीयाचे व्यसन लागण्याचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसते. ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी सांगितलं आहे की माणसाचं मन चंचल आहे हे खरं पण एकदा का त्याला एखाद्या गोष्टीची चटक लागली की ते परत-परत त्या गोष्टींकडे आकर्षित होते. त्याला चिकटून बसते. मनाच्या ह्या स्वभावाला डोपामिन कारणीभूत आहे असे म्हणायला हरकत नाही. जर आपण डोपामिनचा हा गुणधर्म योग्य प्रकारे हाताळायला शिकलो तर डोपामिन आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींपासून प्रेरणा घेऊन आयुष्यात अग्रेसर होण्यास शिकवते पण जर डोपामिनचा हा गुणधर्म आपल्याला नीट हाताळता आला नाही तर छोड्या-मोठ्या वाईट सवयी आणि व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता बळावते. डोपामिनच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे त्यामध्ये केवळ क्षणिक आनंद देण्याचेच सामर्थ्य आहे. दीर्घकाळ टिकणारा आनंद ते देऊ शकत नाही.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला लोकांमध्ये मिसळायला आवडतं. आपल्या परिवारातील लोकांची, आपल्या मित्रमंडळींची, समविचारी लोकांची संगत आवडते. या परस्पर संबंधांतून त्याला आनंदाची प्राप्ती होत असते. माणसाला त्याच्या सामाजिक जीवनातून जो आनंद मिळतो त्याच्या मागे असते ऑक्सीटोसिन नामक रसायन. परस्परांतील मैत्री, प्रेम, ऋणानुबंध, स्पर्श इत्यादी गोष्टींमधून माणूस सुखावतो ते या ऑक्सीटोसिन मुळे. एवढंच कशाला ऑफिसात किंवा कामाच्या जागी जर चांगल्या टीम बरोबर काम करायला मिळालं तर जे समाधान आपल्याला मिळते ते ही या ऑक्सीटोसिन मुळेच. जुन्या मित्रांबरोबर गेट-टुगेदर किंवा आवडत्या व्यक्तिबरोबर केलेला डिनर, जवळच्या मित्र-मैत्रिणी बरोबर केलेलं हितगुज,  प्रियकर-प्रेयसीला एकमेकांच्या सहवासात वाटणारं सुख ह्या सगळ्यात ऑक्सीटोसिनचा हात असतो. पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवल्यावर जी मजा आणि आनंद मिळतो तो सुद्धा ऑक्सीटोसिन मुळेच. ऑक्सीटोसिनचे वैशिष्ठ असे की या रसायनाने मिळणारा आनंद हा दीर्घ कालीन ठरतो. मनाच्या कप्प्यातील अनेक हव्याहव्याशा वाटणाऱ्या आठवणींच्या मागे असते हे ऑक्सीटोसिन रसायन. अध्यात्म मार्गावर सत्संग महत्वाचा का मनाला गेला आहे ते आता तुम्हाला कळू शकेल. आपल्या अवती भोवती चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या माणसांचा वावर असतो. त्यांतील चांगल्या संस्कारांची माणसे ओळखून त्यांच्याशी संबंध जोपासणे शेवटी ज्याच्या-त्याच्या हातात असते. तुम्ही जर नकारात्मक विचार करणाऱ्या माणसांबरोबर राहाल तर तशाच प्रकारची स्पंदने तुमच्यावर आदळत रहातील. याउलट तुम्ही जर सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांमध्ये राहाला तर तुमचा दृष्टीकोनही आपोआप सकारात्मक होईल. त्यांची साथसंगत तुम्हाला आनंद देऊन जाईल.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे हे तर खरंच परंतु त्याला त्याच्या सामाजिक संबंधांतून स्वतःचे महत्व, आदर, श्रेष्ठत्व, ख्याती, लोकप्रियता, सोशल स्टेटस् इत्यादी गोष्टी अधोरेखित होण्याची अपेक्षा देखील असते. या गोष्टी घडल्या की तो सुखावतो. त्याला आनंद होतो. या आनंदाचे कारण असते सेरोटोनिन नामक रसायन. एखादा व्यक्ती उच्चशिक्षित असेल तर त्याला त्याच्या शैक्षणिक श्रेष्ठतेतून एक प्रकारचा आनंद प्राप्त होत असतो. एखादा माणूस गडगंज श्रीमंत असेल तर त्याला आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करून एक प्रकारचा आनंद होत असतो. नवी कोरी गाडी घेतली की लोकांना ती चारचौघांत मिरवावीशी वाटते. त्यातून त्यांना एक प्रकारचा आनंद मिळत असतो. ऑफिस मध्ये प्रमोशन मिळालं किंवा आपल्या कामाची वाहवा झाली की लोकं मनोमन सुखावतात. एवढंच काय पण आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना सुद्धा आपापल्या गुरुपरंपरेचे किंवा आपापल्या साधनामार्गाचे श्रेष्ठत्व इतरांसमोर गातांना एका प्रकारचा आनंद मिळत असतो. अशा प्रकारचा जो काही आनंद असतो तो सेरोटोनिन मुळे प्राप्त होत असतो. वरील उदाहरणांत माणसाची त्याच्या सोशल स्टेटस विषयीची अभिलाषा तर आहेच परंतु त्यातून प्राप्त होणारे सामाजिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा हा सुद्धा माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्या मनातील ही स्थैर्याची आणि सुरक्षिततेची भावना हे सुद्धा सेरोटोनिनचेच कार्य आहे.

तुमच्यापैकी जे लोकं नित्यनेमाने योगासने करतात त्यांनी आपले सुरवातीचे दिवस आठवा. अगदी सोप्पी सोप्पी योगासने तुम्हाला नीट जमत नसत. योगासनांची सवय नसलेले शरीर कुरकुर करत असे. काही दिवस स्नायू दुखतात, सांध्यांत त्रास होतो पण तुम्ही नेटाने ते दु:ख सहन करता. किंबहुना आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी करण्यात तुम्हाला एका प्रकारचा आनंद होत असतो. अशा प्रकारच्या आनंदला कारणीभूत असतं एंडोर्फिन नावाचे रसायन. एंडोर्फिन हे एका प्रकारचे पेन किलर आहे. शारीरिक त्रास सुरु झाला की याचे उत्पादन सुरु होते. एंडोर्फिनच्या प्रभावामुळे शरीरातील दु:ख कमी होऊन एक प्रकारची शिथिलता किंवा शांतता लाभते. त्याचा उपयोग मानसिक तणाव कमी होण्याकरता होत असतो. योगासनेच नाही तर कोणताही व्यायाम प्रकार एंडोर्फिनची निर्मीती करतो. त्यामुळे योगासने करतांना ती मनापासून केली आणि ती करत असतांना आनंद घेत-घेत केली तर एंडोर्फिनचा हा फायदा दुणावतो. आधुनिक काळात शारीरिक फिटनेस हा परवलीचा शब्द बनला आहे. एंडोर्फिनचे कार्य लक्षात घेता केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम आपल्याला आवश्यक का आहे ते तुम्हाला आता कळू शकेल.

वरील चारही "आनंद रसायने" योगसाधनेद्वारे सुयोग्य प्रमाणात निर्माण होतात. विशेषतः योगासने, प्राणायाम, आणि ध्यान यांचा वरील रसायनांच्या निर्मितीवर सुपरिणाम दिसून येतो. अनेक शास्त्रीय प्रयोगांतून आणि निरीक्षणांतून ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. भारतीय अध्यात्मशास्त्रात अनेक साधनामार्ग सांगितलेले आहेत. त्यांची विभागणी साधारणतः कर्मकांड, उपासनाकांड, आणि ज्ञानकांड अशा तीन विभागात केली जाते. कर्मकांडात उपास्य देवतेची स्थुलपुजा, यज्ञ, होम-हवन वगैरे गोष्टींचा समावेश होतो. या सर्व बाह्य गोष्टी आहेत परंतु सर्वसामान्य साधकाला सुरवातीच्या काळात अध्यात्ममार्गाची गोडी लावण्यास उपयोगी पडतात. उपासनाकांडात मंत्र, स्तोत्र, सहस्रनाम, पारायण, पुनश्चरण वगैरे गोष्टींचा समावेश होतो. कर्मकांडापेक्षा उपासनाकांड श्रेष्ठ मानले गेले आहे कारण त्यांत स्थूल उपचारांबरोबरच मानसिक क्रियांचा सुद्धा समावेश होतो. ज्ञानकांड सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे कारण त्यात ज्ञानगर्भ उपदेश, सत-असत विचार, आणि आत्मज्ञानाचे अनुसंधान करायचे असते. जर वरील तीन संज्ञा योगशास्त्राला लावायच्या ठरवल्या तर शुद्धीक्रिया, योगासने वगैरे गोष्टी म्हणजे योगशास्त्रातील "कर्मकांड" म्हणता येईल. प्राणायाम, मुद्राभ्यास, मंत्रसाधना वगैरे गोष्टी म्हणजे योगशास्त्रातील "उपासना" म्हणता येतील. धारणा, ध्यान, आणि समाधी ही त्रिपुटी म्हणजे योगशास्त्रातील "ज्ञानकांड" असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तात्पर्य हे की योगशास्त्राच्या शास्त्रशुद्ध आणि सशक्त सोपानावर साधक आनंदाचा राजमहाल नक्कींच उभा करू शकतो. गरज आहे ती प्रामाणिकपणे योगमार्गाची वाट चोखाळण्याची. योगशास्त्राला आपला आयुष्यभराचा सोबती म्हणून स्वीकारण्याची.

असो.

जगन्माता कुल-कुंडलिनी आणि अजपा गायत्री सर्व योगाभ्यासी वाचकांना आनंदाचा "डोस" प्रदान करोत या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 30 November 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates