Untitled 1

मनाला मर्यादित ज्ञानाच्या दावणीला बांधू नका

एकदा रामकृष्ण परमहंस त्यांच्या काही शिष्यांबरोबर कोठेसे चालले होते. वाटेत एके ठिकाणी त्यांच्या शिष्यांना एक भिकारी दिसला. एका उकिरड्यावर तो भिकारी फतकल मारून बसला होता. त्याच्या अंगावर धड वस्त्रेही नव्हती. लोकांनी टाकलेला कचरा दुर्गंधी पसरवत होता. माशा घोंगावत होत्या. त्या उकिरड्यावर टाकलेले शिळे अन्न तो भिकारी मोठ्या आवडीने खात होता. उकीरड्यावरचे कुत्रे मधूनच तो खात असलेल्या अन्नात तोंड घालत होते. त्याचेही त्या भिकाऱ्याला काही सोयरेसुतक नव्हते. एकंदरीत कोणालाही किळस वाटावी आणि त्या भिकाऱ्याची दया वाटावी असे ते चित्र होते.

रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे शिष्य त्या रस्त्याने जाऊ लागले. एवढ्यात परमहंसांची आणि त्यांच्या शिष्यांची नजर त्या भिकाऱ्यावर पडली. ते किळसवाणे दृश्य पाहून शिष्यांनी नाकं मुरडली. त्या भिकाऱ्याला रामकृष्ण परमहंसांनी पाहिले मात्र आणि ते ओरडले - "अरे, तो साक्षात्कारी ज्ञानी आहे. जा त्याला आदरपूर्वक घेऊन या."

गुरूची आज्ञा मिळताच शिष्य त्या भिकाऱ्याकडे धावले. शिष्य आपल्याकडे येताहेत हे पाहून तो भिकारी पळू लागला. तो भिकारी पुढे आणि शिष्य मागे अशी पळापळ सुरु झाली. पळता पळता एक वेळ अशी आली की एका अरुंद गल्लीचा शेवट आला. पुढे रस्ता नाही. मागे शिष्यांचा घोळका. शिष्यांना खात्री होती की आता काही तो भिकारी हातून सटकून जाणार नाही. तोच एक अघटीत घडले. तो भिकारी त्या सर्वांदेखत हवेत हळूहळू विरून गेला. सगळे शिष्य आश्चर्याने थक्क होऊन बघत राहिले.

ज्याला शिष्य भिकारी समजत होते तो निघाला ज्ञानी सत्पुरुष. लोकांच्या नजरेपासून स्वतःला अलिप्त राखण्यासाठी त्याने भिकाऱ्याचे सोंग घेतले होते. शिष्य काही त्याला ओळखू शकले नाहोत परंतु रामकृष्ण परमहंसांनी मात्र त्याला लगेच ओळखले.

शिष्य त्या "भिकारी" व्यक्तीला त्याच्या यथार्थ स्वरूपात का बरं जाणू शकले नाहीत? कारण त्यांच्या मनाची कवाडे पूर्वग्रह आणि पूर्वानुभव यांनीच भरलेली होती. कदाचित त्यांनी वेगवेगळ्या शास्त्र ग्रंथांतून किंवा तत्सम स्त्रोतांमधून साक्षात्कारी ज्ञानी माणसांची लक्षणं ऐकली-वाचली होती. त्यांतील कोणतेही लक्षण त्या "भिकाऱ्यात" न आढळल्याने त्यांच्या मनाला आणि बुद्धीला त्याचे ज्ञानीपण न दिसता त्याचे भिकारीपणच दिसले.  

दुसरं उदाहरण आमच्या सॉफ्टवेअर क्षेत्रातलं देतो. असं समजा की दोन नवशिक्या सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना दोन भिन्न-भिन्न प्रोग्रामिंग लॅंगवेजेस शिकवण्यात आल्या आहेत. त्या प्रोग्रामिंग लॅंगवेजेसचे फिचर्स आणि कीवर्ड्स वेगवेगळे आहेत. त्यानंतर त्यांना एक प्रॉब्लेम सोल्व्ह करण्यासाठी देण्यात आलेला आहे. त्यावेळी बहुतांशी वेळा असं आढळत की त्यांनी तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी निवडलेली पद्धती आणि त्यांना येत असलेली प्रोग्रामिंग लॅंगवेज यांचा घनिष्ठ संबंध असतो. शिकलेल्या आणि वापरत असलेल्या प्रोग्रामिंग लॅंगवेज नुसार त्यांची प्रॉब्लेम कडे पहाण्याची दृष्टी बनत असते. त्यांची विचार करण्याची कक्षा त्यांना येणाऱ्या प्रोग्रामिंग लॅंगवेज नुसार जणू मर्यादित होत असते. त्यांची विचारशैली साचेबद्ध बनते.

आपल्या सगळ्यांबरोबर आयुष्यात असं कधी ना कधी झालेलं आहे. आपण लहानपणा पासून जे शिकतो, वाचतो, ऐकतो आणि अनुभवतो त्या मर्यादित ज्ञानाच्या आधारावर आपले व्यक्तिमत्व विकसित होत असतं. आता हे सगळे ज्ञानाचे स्त्रोत टाकावू आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. ते दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी अत्यावश्यक आहेतच. परंतु या संपूर्ण ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियांत मनाला एक प्रकारची झापडं नकळत लागतात. ती झापडं लागली की मन स्वतंत्र आणि मोकळेपणाने विचार करू शकत नाही. मन साचेबद्ध बनून जाते. मन एकदा साचेबद्ध बनले की ते विशिष्ठ प्रकारच्या अनुभवांकरिताच उघडे राहू लागते. त्याची कक्षा मर्यादित बनते. ते त्या कक्षेच्या पलीकडे जाऊन अनुभूती प्राप्त करायची टाळाटाळ करू लागते. असे मर्यादित झापडं लावलेले मन आध्यात्मिक प्रगतीत अडथळा बनते.

आता एक योगमार्गावरचं उदाहरण देतो. खरंतर या उदाहरणासाठी वरील दोन उदाहरणांचा प्रपंच करावा लागला. आता आता मला काय म्हणायचं आहे ते अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल.

समजा मी तुम्हाला सांगितलं की आत्मा हा डोळ्यांना दिसतो आणि त्याला आकार / रंग असतो. माझ्यावर विश्वास ठेवाल? बहुतेक जण विश्वास ठेवणार नाहीत. तुम्ही कदाचित म्हणाल की काय मूर्ख माणूस आहे हा. सर्व शास्त्र ग्रंथ एकमुखाने सांगतात की आत्मा हा दृष्टिगोचर नसून त्याला आकार, रंग वगैरे उपाध्या बिलकुल नाहीत. मग तो डोळ्यांनी बघण्याचा प्रश्नच नाही.

इथेच फसायला होतं साधकांना. बहुतेक साधक या अशाच वाचीव-ऐकीव ज्ञानाच्या आधारावर आपले अध्यात्म मार्गाविषयीचे मत बनवत असतात. ते तसं बनवायलाही हरकत नाही पण या प्रक्रियेत मनाला बंदिस्त होऊ देता कामा नये. वाचा, ऐका, बघा, शिका, अनुभवा पण त्याचबरोबर मनाची कवाडं आजवर घेतलेल्या अनुभावांपलीकडील अनुभवांसाठी सदैव उघडी ठेवा. ती बंद करू नका. मनाला कोणत्याही विशिष्ठ साच्यात ओतू नका.

आता अजून एक पायरी पुढे जाऊ. आत्मा हा दृष्टीगोचर नाही हे जे सांगितलं आहे ते कोणत्या दृष्टीचा reference point पकडून? अर्थात सर्वसामान्य मानवी दृष्टीचा. आता असं समजा की कोणीतरी तुम्हाला योगमार्गातील उच्चतर अवस्था प्रदान केली आहे ज्यांद्वारे तुमच्या दृष्टीची कक्षा संपूर्णपणे बदलून गेलेली आहे. तुमची दृष्टी सर्वसामान्य मानवी देहाची दृष्टी न रहाता ती दिव्य बनली आहे. भगवान श्रीकृष्णाने जे विश्वरूप दाखवले ते सामान्य डोळ्यांनी अर्जुनाला पाहता आले नाही. मग श्रीकृष्णाने त्याला दिव्य दृष्टी दिली. तेंव्हाच त्याला ते पहाता आले. तसंच काहीसं. आता जो आत्मा तुम्हाला आजवर दृष्टीगोचर नव्हता तोच आत्मा कदाचित दृष्टीगोचर प्रतीत होऊ लागेल. हे फक्त एक उदाहरण म्हणून सांगतोय. नीट विचार करा. परत परत विचार करा. येथे फार खोलात जात नाही.

तात्पर्य हे की योगमार्गावर जे विलक्षण अनुभव येतात त्यांचे नीट आकलन होण्यासाठी आणि त्यांचा आनंद उपभोगण्यासाठी मनाला पूर्वग्रहांच्या दावणीला न बांधता ते विशाल सरोवराच्या लाटांवर स्वार होण्यालायक बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंबहुना साधनेचा तो एक अविभाज्य घटक आहे. हे साधणे सहज सोपं नाही. त्याला वेळ लागतो. अथक प्रयत्न लागतात. प्रत्येक साधकाने ही कला अवश्य आत्मसात केली पाहिजे.

असो.

योगसागरातील दिव्य अनुभूती प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली तीव्र इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती जगदंबा कुंडलिनी सर्व योगाभ्यासी वाचकांना प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 25 November 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates