Untitled 1

नवीन वर्षी अजपा ध्यानाला पोषक "या" दहा गोष्टी अवश्य करा

नवीन वर्ष सुरु झाले आहे. मागील वर्षाने शिकवलेले धडे घेऊन काहीशा साशंकतेने आणि काहीशा उत्साहाने सर्वांनी नवीन वर्षात पाऊल टाकले आहे. या वर्षी अजपा ध्यानाभ्यास जास्तीत जास्त चांगला व्हावा यासाठी खालील दहा गोष्टीं आवर्जून पाळाव्यात असं मी सांगीन. यांतील अनेक गोष्टी मी मागच्या लेखांतून अनेकवेळा सांगितल्या आहेत परंतु वर्षारंभी त्यांची झटकन उजळणी करण्यास हरकत नसावी.

१. लोकरीचे आसन

अजपा ध्यानाला बसतांना कधीही थेट जमिनीवर किंवा लाकडाच्या पृष्ठभागावर बसू नये. एखादे छानसे लोकरीचे चौकोनी आकाराचे आसन तयार करावे आणि त्यावर ध्यानाला बसावे. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. बाजारात लोकरीचे कपडे, शाली वगैरे सहज उपलब्ध होतील. आसनाचा रंग शक्यतो लाल, पिवळा, किंवा शुभ्र पांढरा असावा. अर्थात काही कारणाने हे रंग मिळाले नाहीत तर त्यातल्या त्यात मिळतेजुळते रंग घ्यावेत. काळा, गडद निळा असे रंग टाळावेत. चित्रविचित्र डिझाईनच्या प्रिंट पेक्षा एकरंगी आसन निवडण्याचा प्रयत्न करावा. गरज वाटल्यास लोकरीच्या आसनावर सुती वस्त्र अंथरण्यास हरकत नाही. ध्यानसाधना झाली की हे आसन नीट उचलून ठेवावे. अन्य वेळी बसण्यासाठी वगैरे या आसनाचा वापर करू नये.

२. रुद्राक्षाची माळ

अजपा ध्यानाच्या जोडीला तुमच्या इष्टमंत्राचा जप अवश्य घडला पाहिजे. आधुनिक काळात काही साधक जप माळ वगैरे वापरण्यापेक्षा मोबाईलच्या टाईमरवर किंवा जप काउंटरवर तो मोजतात. तसं करण्यापेक्षा रुद्राक्षाची जपमाळ वापरणे केंव्हाही श्रेयस्कर आहे. बाजारातून एखाद्या खात्रीच्या दुकानातून लोकरी किंवा रेशमी धाग्यात सुबकपणे ओवलेली माळ तुम्ही थोडा शोध घेतलात तर सहज प्राप्त करू शकाल. रुद्राक्षाच्या नावाखाली लाकडाचे मणी किंवा "भद्राक्ष" नाहीत ना याची नीट खात्री करावी म्हणजे झाले. अजपा ध्यानाच्या आगोदर इष्टमंत्राचा जप माळेवर करावा आणि मग अजपा ध्यानाला बसावे. जपमाळ गळ्यात घालू नये.  जप झाला की नीट उचलून देव्हाऱ्यात ठेवावी किंवा आसनाबरोबर एखाद्या छोट्या कापडी पिशवीत गुंडाळून ठेवावी.

३. शिवलिंग आणि शिवयंत्र उपासना

अजपा साधना ही "आत्मारामाची" साधना आहे. जरी ती शिवमुखातून प्रगट झालेली असली तरी ती काही कोणत्या एका विशिष्ठ देवी-देवतेची उपासना नाही. परंतु बहुतेक नवीन साधकांना आपल्या श्रद्धेसाठी काहीतरी स्थूल Anchor Point लागतो. जर तुम्हालाहो तसा लागत असेल तर स्थूल शिवलिंगाची अथवा शिवयंत्रांची उपासना तुम्ही करू शकता. अशी उपासना करत असतांना आपला प्रवास स्थूलाकडून सूक्ष्माकडे होत आहे ना याची काळजी मात्र घ्यावी. केवळ स्थूल उपासनेमध्ये अडकून राहू नये. आजकाल लोकं बाजारातून टीचभर आकाराची तांब्याच्या पत्र्यावर उठवलेली यंत्रे आणतात आणि आपल्या पाकिटात, गळ्यात, मोबाईल कव्हरमध्ये, किंवा खिशात ठेवतात. हा जरी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय असला तरी त्या यंत्राचे पावित्र्य जपले जात आहे ना ते पाहिले पाहिजे. वाटेल तसे हात, घाम, धूळ इत्यादींपासून त्यांचा बचाव केला पाहिजे. त्यामुळे यंत्रे ही देवघरात पूजेत ठेवणेच सगळ्यात उत्तम.

४. ध्यानाला बसण्याची दिशा

खरंतर मानवी पिंडातील "अजपा गायत्रीचा" जप निरंतर सुरूच असतो. त्यामुळे अजपा ध्यानाला दिशा, वेळ, मुहूर्त अशी बंधने नाहीत. परंतु जेंव्हा तुम्ही अजपा ध्यान एक योगसाधना म्हणून करत असता तेंव्हा शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. मंत्रशास्त्रात दिशाविषयक काही नियम आहेत. तुम्हाला ज्या प्रकाराचा फायदा मिळवायचा आहे त्यानुसार भिन्न-भिन्न दिशा मंत्रशास्त्रात सांगितलेली आहे. पूर्व आणि उत्तर ह्या दोन दिशा साधारणतः कोणत्याही शुभ उद्दिष्टांसाठी चालतात त्यामुळे त्या दिशा पाळण्याचा यत्न करावा. याबाबतीत थोडे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. समजा तुम्ही देवघरात ध्यानाला बसणार आहात. जर पूर्व किंवा उत्तर दिशेला बसल्याने देवाकडे पाठ फिरवली जाणार असेल तर तसं बसणं योग्य होणार नाही. अशावेळी देवाकडे तोंड करूनच बसलेलं योग्य राहील.

५. SMF Technique चा अंगीकार

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येतच असतात. साधारणतः चांगल्या दिवसांचे श्रेय माणूस आपल्या शिक्षणाला, कर्तुत्वाला, आपल्यावरील संस्कारांना, आपल्या मनगटातील ताकदीला देतो. वाईट काळ आला की मात्र त्याचे मन सैरभैर होऊ लागते. मग आपसूकच त्याचे मन आसमंतातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गोष्टींमध्ये परिस्थितीची उत्तरे शोधू लागते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माणसाच्या पडत्या काळाकडे नजर टाकली की असं स्पष्ट जाणवतं की या काळात त्याचा आत्मविश्वास कमकुवत झालेला आहे. त्याचे मन अस्थिर आणि चंचल झालेले आहे. त्याच्या जवळचे आंतरिक ओज-तेज जणू अस्तंगत पावलेले आहे. अशा काळात ध्यानसाधनेला बसणे सुद्धा त्याला जमत नाही. अशा वेळी SMF Technique ची मदत अवश्य घ्यावी. किंबहुना मी तर असं सांगीन की तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा SMF Technique ही दैनंदिन जीवनाचा भागच बनवून टाकावी.

६. अन्य मार्गांचा द्वेष नको

भारतीय अध्यात्ममार्गात अनेक पंथ, उपपंथ, संप्रदाय होऊन गेले. त्यांनी आपापले साधनामार्ग प्रसारित आणि प्रचारित केले. अजपा जप हा भगवान शंकर आणि जगदंबा पार्वती यांच्या संवादातून स्फुरलेला मार्ग आहे. प्रत्येकाला आपापली गुरुपरंपरा, आपापली साधना प्रणाली यांच्याविषयी रास्त आदर आणि अभिमान असायलाच हवा. परंतु आपल्या साधना प्रणालीचा आदर जपत असतांना दुसऱ्याच्या मताचा आणि साधना प्रणालीचा अनादर आपल्या हातून घडणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायला हवी. सर्वसामान्य माणसासारखंच "मी तेवढा श्रेष्ठ, बाकी सारे कनिष्ठ" असं वर्तन निदान अध्यात्ममार्गी म्हणवणाऱ्या साधकाकडून अपेक्षित नाही. हे नेहमी लक्षात ठेवावे.

७. वाणीचे पावित्र्य राखा

योगशास्त्रात वाणीची वर्गवारी परा, पश्यंती, मध्यमा, आणि वैखरी अशा चार प्रकारांत केली जाते. वाणीच्या या चार प्रकारांचा सुषुम्ना मार्गावरील विशिष्ठ चक्रांशी जवळचा संबंध आहे. साधारणतः जपसाधनेची सुरवात साधक वैखरी वाणीपासून करत असतो. त्यामुळे आपली वाणी अमंगळ शब्दांनी किंवा शिव्याशापांनी भरलेली नाही ना याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. मोठ्याने बोलणे, रागारागाने बोलणे, अनावश्यक बडबड करणे वगैरे गोष्टीसुद्धा टाळल्या पाहिजेत. या कामी नामस्मरणाची सवय फार उपयोगी पडते. मनाला ईश्वरनामाची गोडी लागली की मग "चत्वारी वाचा" त्यातच दंग रहायला लागतात. बरीच वर्षे मंत्रजप करूनसुद्धा काहीच फायदा जाणवत नसेल तर प्रथम आपली वाणी "तपासून" पहावी.

८. निवडक योगासने

काही साधकांना जप किंवा ध्यान वगैरेंची आवड असते परंतु हठयोगोक्त आसने, बंध, प्राणायाम वगैरे नकोसे वाटतात. अजपा ध्यानाचा सराव करत असतांना ढीगभर योगासने करण्याची गरज नसली तरी काही मोजकी योगासने अंगीकारायला हरकत नसते. ध्यानाला बसण्यापूर्वी योगासने, प्राणायाम, बंध, मुद्रा वगैरे केल्याने तरतरी येते. उत्साह वाटतो. झोप आणि मरगळ निघून जाते. परिणामी ध्यानसाधना चांगली घडते.

९. हस्तमुद्रांचा वापर

योगमार्गावरील मुद्रा या प्रामुख्याने दोन प्रकारच्या आहेत. हठयोगातील मुद्रा आणि मंत्रयोगातील मुद्रा. हठयोगातील मुद्रांविषयी वर उल्लेख आलेलाच आहे. अजपा ध्यानाभ्यास करणाऱ्याने त्याजोडीला मंत्रयोगातील मुद्रांचा अवलंब केल्यास फायदा वृद्धींगत होतो. मंत्रयोगात अनेक मुद्रा आहेत. तुमच्या उपास्य दैवतेनुसार त्या मुद्रासुद्धा बदलतात. तुमची श्रद्धा असलेल्या एखाद्या जाणकाराकडून या मुद्रांची नीट माहिती करून घ्यावी आणि मगच त्यांचा ध्यानसाधनेत अवलंब करावा. हस्तमुद्रांपैकी अनेक मुद्रा अशा आहेत की वरकरणी त्यांचा काही शारीरिक लाभ असत नाही पण उपासनेच्या दृष्टीने मात्र काही आध्यात्मिक  लाभ घडून येत असतो. हा विषय थोडा क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा असल्याने येथे फारसे काही सांगत बसत नाही.

१०. चांगली संगत

खरंतर योग-अध्यात्ममार्गी माणसाला सत्संगाचे महत्व सांगण्याची बिलकुल गरज नाही. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं म्हणतात. या समाजप्रियतेच्या ओघात तो अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींच्या संपर्कात येत असतो. यापैकी काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना तुमच्या प्रगतीने, यशाने फार आनंद होत असतो. तुमची आई, तुमचे वडील, तुमचे गुरु वगैरे लोकं या प्रकारात मोडतात. त्यांच्या मनात तुमच्यासाठी सदैव प्रेम आणि सद्भावना नांदत असते. प्रसंगी ते तुम्हाला ओरडत असतील किंवा खडे बोल सुनावत असतील पण त्यामागे तुमचं भलं व्हावं हीच तळमळ असते. याउलट काही माणसं अशी असतात की ज्यांना तुमची प्रगती, तुमचे यश टोचत असते. गमतीचा भाग असा की यांतील बरीच मंडळी "मित्र" नामक बुरख्याखाली आसपास वावरत असतात. त्यांच्या मनात तुमच्याविषयी चांगली भावना नाही याचा अर्थ तुम्हीसुद्धा त्यांच्याप्रती तशीच भावना बाळगावी असं अजिबात नाही. सध्या जरी काही कारणांमुळे त्यांचे मन कलुषित झालेले असले तरी ईश्वराची इच्छा असेल तर एक दिवस त्यांच्या मनातील तुमच्या विषयीच्या गैरसमजांचे मळभ दूर होईल. त्यांना सद्बुद्धी मिळावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करावी आणि त्यांच्यापासून अलिप्त राहावे. मानवी मन प्रतिक्षण संस्कार ग्रहण करत असते. काही माणसे मनावर सकारात्मक संस्कार घडवतात तर काही माणसे मनावर नकारात्मक संस्कार सोडून जातात. माणसांची वर्गवारी चांगला किंवा वाईट अशी करण्यापेक्षा आपल्या मनाचा पोत सुधारण्याच्या दृष्टीने त्याकडे पहावे हे अधिक योग्य राहील.

असो.

भगवान शिव आणि जगदंबा पार्वती यांच्या संवादातून स्फुरलेले अजपा विज्ञान सर्व योगाभ्यासी वाचकांना योग्य मार्ग दाखवो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 04 January 2021