Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

Untitled 1

योगसाधनेतील त्रिविध पीडा - कारण आणि निराकरण

सर्व योगाभ्यासी वाचकांनी नवरात्रीच्या शुभ दिवसांत आपापल्या श्रद्धेनुसार काही ना काही साधना अवश्य केली असणार याची मला खात्री आहे. लवकरच दिवाळीचे आगमन होणार आहे. नवरात्रीचे पर्व ज्याप्रमाणे साधना-उपासनेला पोषक मानले जाते त्याचप्रमाणे दिपोत्सवाचे पर्व सुद्धा साधनेसाठी अतिशय शुभ आणि पोषक मानले गेले आहे. योगाभ्यासी वाचकांनी त्यादृष्टीने आतापासूनच तयारीस लागावे आणि दिवाळीतील साधना-उपासनेची यथायोग्य आखणी करावी.

असो. आजच्या विषयाकडे वळू या.

मानवी आयुष्य प्रतिक्षण सुख-दुःखाच्या जात्याखाली भरडले जात असते. माणूस योगमार्गी असो अथवा नसो त्याच्या वाट्याला सुख आणि दुःख ही येतंच असतात. गंमत अशी की सुख आणि दुःख हे दोन्ही जरी मानवी आयुष्याचा अविभाज्य घटक असले तरी माणसाची आंतरिक ओढ मात्र फक्त सुखाकडेच असते. सुखांकडे तो आवड म्हणून पहात असतो तर दुःखांकडे तो अपरिहार्यता म्हणून पहात असतो. असं का बर होत? याचं कारण आत्म्याचा मूळ स्वभाव हा दुःख रहित अर्थात सत-चित-आनंद स्वरूप आहे. माणूस आपल्या अंतरात्म्याच्या मूळ गुणधर्मानुसार सुखांकडे आकर्षित होत असतो तर दुःखांपासून दूर रहाण्याचा त्याचा प्रयत्न असतो. सामान्य माणसाची गल्लत कुठे होते तर तो सुखाचा स्त्रोत अंतरंगात न शोधता बाह्य गोष्टींमध्ये शोधत असतो.

प्राचीन काळच्या जाणकारांनी मानवी आयुष्यातील दुःखांचे वर्गीकरण तीन गटांत केलेले आहे - आध्यात्मिक पीडा, आधिभौतिक पीडा, आणि आधिदैविक पीडा. यांनाच त्रिविध पीडा किंवा त्रिविध ताप असंही म्हणतात. त्रिविध पीडा म्हणजे काय त्याचं सर्वसाधारण स्पष्टीकरण तुम्हाला अनेक आध्यात्मिक ग्रंथांत आढळेल. दासबोधातही त्यांविषयी विस्ताराने फार छान वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे येथे मी परत सर्वसामान्य विश्लेषण करत बसणार नाही. येथे मी या त्रिविध पिडांकडे कुंडलिनी योगसाधनेच्या आणि कुंडलिनी योगसाधकांच्या दृष्टीने बघणार आहे. त्याचं अनुषंगाने साधनेतील या त्रिविध पिडांचे निराकरण कसे करायचे त्याविषयी सुद्धा काही सांगणार आहे.

आध्यात्मिक पीडा ह्या पंचकोषांशी संबंधित असतात. एकाद्या साधकाला योगासने करतांना शरीर लवचिक नसल्याने त्रास होतो. कोणाला बराचवेळ मांडी घालून ध्यानाला बसता येत नाही. कोणाला बंध फार काळ लावायला जमत नाही. कोणाला नाद श्रवण करतांना षण्मुखी मुद्रा लावतांना लगेच हात दुखायला लागतात. दुसऱ्या एखाद्या साधकाला नाडीशोधन प्राणायाम करतांना नेहमी एक स्वर बंद राहिल्याने प्राणायाम नीट करता येत नाही. कोणाला जपाला बसल्यावर काम-क्रोधादी विकार बळावल्याचा अनुभव येतो. काहींची अवस्था "कळतं पण वळत नाही" अशी असते. योगविचार पुस्तकांत वाचतांना किंवा एखाद्या व्हिडिओ मध्ये ऐकतांना छान वाटतो पण प्रत्यक्ष आचरणात विवेकाने वागणे काही केल्या घडत नाही. ह्या आणि अशा सगळ्या गोष्टी साधनेच्या दृष्टीने आध्यात्मिक पीडा आहेत. ह्या पिडांचा स्त्रोत साधकाच्या शरीर-मनात असतो. या गोष्टी साधकाला शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर त्रासदायक ठरतात.

आधिभौतिक पीडा ह्या बाह्य गोष्टींपासून होत असतात. उदाहरणार्थ, काही जणांना साधनेसाठी स्थल-काल-आसन मनासारखे मिळत नाही. अनेक साधकांचा असा अनुभव असतो की ठरवून एखादे अनुष्ठान वगैरे मांडले की त्यांत काहीतरी विघ्न येते. मौन व्रत धारण केले की हमखास आप्त-स्वकीयांचे महत्वाचे फोन वगैरे येऊन त्यात मोडता घातला जातो. काही वेळा साधना छान झालेली असते पण नेमकं घरातील कोणी सदस्य घरगुती भांडण किंवा कुरबुरी काढतो आणि साधनेचा आंनंद आणि शांति अल्पजीवी ठरते. काही वेळा साधनेला बसलं की नेमका तेंव्हाच माशा, डास, किटक इत्यादींचा उपद्रव होतो. या आणि अशा सगळ्या गोष्टींचा स्त्रोत बाह्य जगतात आहे आणि त्यामुळे साधनेच्या दृष्टीने या आधिभौतिक पीडा ठरतात.

कुंडलिनी योग ही योगशास्त्राची अशी शाखा आहे की त्यावर अनेक विस्मयकारी, सर्वसामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही असे अनुभव साधकाला येत असतात. कुंडलिनी योगमार्गावरील प्रगत साधकाची दैवीय शक्तींकडून प्रसंगी परीक्षा घेतली जाते. ढोबळमानाने त्यांना शास्त्रात यक्ष-यक्षिणी, भैरव-भैरवी, योगिनी, सिद्ध वगैरे नावे दिलेली आहेत. फार खोलात न जाता किंवा या नावांनी बाचकून न जाता येथे एवढंच लक्षात घेतलं तरी पुरेसे आहे की शिव आणि शक्ती तत्वांची ओळख होण्याआगोदर त्यामानाने लहान अशा शक्तींशी साधकाची गाठभेट होत असते. त्यांतील काही शक्ती साधकाला मदत करत असतात तर काही त्याच्या साधनेत विक्षेप आणत असतात. त्याच बरोबर साधकाचा प्रारब्ध भोग सुद्धा फार महत्वाची भूमिका बजावत असतो. साधनेतील प्रगती ही साधकाच्या कर्मांवर सुद्धा अवलंबून असते. कधी कधी साधकाच्या हातून परपीडा, परनिंदा, अभक्ष्य भक्षण असे दोष घडलेले असतात. शास्त्रात अशा दोषांचे किंवा पातकांचे विस्ताराने वर्णन आहे. या सर्व निषिद्ध कर्मांची फळे त्याला भोगावी लागतात. ईश्वरी शक्ती त्याला अशा पातकांचे फळ अवश्य प्रदान करत असते. वरील सर्व गोष्टी दैवी शक्तींच्या आणि दैवी इच्छेच्या अधीन असतात. त्यामुळे त्या आधिदैविक पीडा ठरतात.

आतापर्यंत आपण त्रिविध पीडा साधनेच्या दृष्टीकोनातून जाणून घेतल्या. आता प्रश्न असा की या पीडा कमी करण्यासाठी किंवा त्यांचे पूर्णतः शमन करण्यासाठी काही करणे शक्य आहे का? यांतील काही पीडांचे  पूर्णपणे शमन करणे शक्य असले तरी सगळ्याच पीडा काही पूर्णपणे टाळता येत नाहीत. असे असले तरी साधकाने काही सवयी अंगीकारल्या किंवा काही गोष्टी पाळल्या तर या पीडांशी तो सक्षमपणे मुकाबला करू शकतो.

पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ईष्ट देवतेच्या भक्तीत बिलकुल कमतरता येऊ द्यायची नाही. बऱ्याच वेळा साधकाची गत "विनाश काले विपरीत बुद्धी" अशी होत असते. असं झालं की तो ईष्ट दैवतेला आणि सन्मार्गाला सोडून भलत्याच उपासनांच्या मागे लागतो. साधनामार्गावर करू नये ते करतो. बोलू नये ते बोलतो आणि वागू नये तसं वागतो. साधकाला आपलं हित कशात आहे आणि अहित कशात आहे ते नीट ओळखता आलं पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या साधनेवर अतूट विश्वास असला पाहिजे. एकदा साधनामार्ग निवडला की त्यावरून आयुष्यभरासाठी वाटचाल करण्याची तयारी हवी. गंमत बघा. सर्वसामान्य शिक्षण घेण्यासाठी आजकाल वीस-पंचवीस वर्ष खर्ची घातली जातात. परंतु आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती मात्र दोन-पाच वर्षांत व्हावी अशी साधकांची अपेक्षा असते. तसं कधी घडत नाही. श्रद्धा-सबुरी-शिस्त-समर्पण ही चतुःसूत्री लागतेच. अशा पीडा कधी जाणवल्या तर कुरकुर करत अजिबात बसायचं नाही. तक्रार, चिडचिड, आदळआपट तर अजिबात करायची नाही. अंगात थोडीतरी तितिक्षा बाणवायची. शांत चित्ताने ईष्ट, अजपा गायत्री, आणि कुल-कुंडलिनीचे स्मरण करत त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करायचा.

आपला ईष्ट मंत्राचा जप अशावेळी वाढवावा. जप किती वाढवावा ते अर्थातच तुम्हाला उपलब्ध असलेला वेळ, मंत्र आणि गुरुआज्ञा यांवर अवलंबून आहे. प्राचीन ऋषीमुनींनी आणि योग्यांनी आपल्याला मंत्रविज्ञानाची अमुल्य देणगी दिलेली आहे. दहा वेगवेगळे मंत्र जपत बसण्यापेक्षा ईष्ट मंत्र म्हणजे काय, आपला ईष्ट मंत्र कोणता आणि त्याचा वापर वेगवेगळ्या प्रसंगी कसा करायचा ते नीट शिकून घेतलं पाहिजे. त्या दृष्टीने आपली मंत्रांची निवड अचूक आहे ना ते पडताळून पहावे. सहज म्हणून एक गंमत सांगतो. ज्यांना बराच प्रयत्न करून सुद्धा मंत्र सिद्ध होत नाही किंवा लाखो वेळा जप करून सुद्धा काहीच फायदा होत नाही त्यांनी आपल्या "चत्वारी वाचा" शुद्ध सात्विक आहेत का ते जरा पडताळून पहावे. कदाचित त्यातच उत्तर मिळेल. परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी यांपैकी एकात जरी दोष राहिला तरी तो त्रासदायक ठरतो.

पीडा निरसन करत असतांना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यायची. विशेषतः आहारात तामसी पदार्थ निदान या कालखंडात कमीतकमी येतील असं पाहायचं. योगशास्त्रातील मिताहाराची संकल्पना आपण यापूर्वी अनेक लेखांतून जाणून घेतली आहे. आयुष्यभर जर मिताहार अवघड वाटत असेल तर निदान या कालखंडात तरी मिताहाराला घट्ट चिकटून राहायचं. खाल्लेल्या अन्नाचा प्राणावर आणि प्राणाचा मनावर परिणाम होत असतो. आहार चुकीचा असलेल्या माणसांची विवेकशक्ती दुबळी बनलेली असते. तेंव्हा त्या दृष्टीने आहाराकडे लक्ष द्यावे.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे परपीडा कटाक्षाने टाळायची. आपल्या वागण्या-बोलण्याने कोणी दुखावला जाणार नाही, कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची. प्रत्येकाला वाटत असतं की आपण बरोबर आहोत आणि दुसरा चुकीचा आहे परंतु कोण चूक आणि कोण बरोबर ते ठरवण्याचा अधिकार ईश्वरी शक्तीचा आहे. तो अधिकार ईश्वरी शक्ती यथायोग्य वेळेला वापरत असते. त्यामुळे आपल्याला परपीडेचा दोष लागणार नाही असं पाहायचं. सुरवातीला हे कदाचित कठीण वाटेल पण अगदीच काही ते अशक्य नाही.

असो.

मातृस्वरूपा श्रीकुंडलिनी आपल्या कृपाशीर्वादाने सर्व योगाभ्यासी वाचकांचे त्रिविध पीडांपासून रक्षण करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स साठी अजपा ध्यानाची ओंनलाईन सेशन्स. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 02 November 2020