Untitled 1

पर्यावरण स्नेही योगोपासना

आजकाल सर्व सुशिक्षित समाजामध्ये पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे महत्व याविषयी जागरूकता आलेली आहे. मग तो प्लास्टिकचा वापर असो किंवा मातीच्या गणेशमूर्ती असोत किंवा फटाके असोत. प्रत्येक पर्यावरण स्नेही आपापल्या परीने छोट्या-छोट्या गोष्टींद्वारे या कार्यास हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहे. आज त्या दृष्टीने योग, उपासना, अध्यात्म इत्यादी विषयांत गोडी असणाऱ्या साधकांना काही खारीचा वाटा उचलता येईल का ते पाहणार आहोत.

तुम्ही जर इंटरनेट आणि सोशल मिडियाकडे नजर टाकलीत तर Natural Living, Sustainable Living, Zero Waste Living वगैरे झगमगीत शब्द बरेच वाचायला-ऐकायला मिळतील. प्राचीन काळचे योगी, ऋषी-मुनी, संन्यासी हे नेहमीच निसर्गावर अतोनात प्रेम करणारे होते. अनेकांचे वास्तव्य निसर्गाच्या कुशीत, जंगलात, पर्वतराजीत असे. निसर्ग देवता त्यांना नेहमीच आदरणीय वाटे. आधुनिक काळात हे चित्र बदलले आहे. विशेषतः शहरात राहणाऱ्या साधकांना निसर्ग देवतेचा रोष अनेक प्रकाराने सहन करावा लागत आहे. तुम्ही पाळत असलेल्या कोणत्याही रूढी-परंपरा टाकून द्याव्यात असं बिलकुल म्हणणं नाही. श्रद्धा ही शेवटी ज्याची-त्याची व्यक्तिगत बाब आहे. ती काही कोणाला dictate करता येत नाही. पण त्यात पर्यावरणाच्या दृष्टीने काही छोटे-छोटे बदल करता येतील का ते पहायला काय हरकत आहे. तेंव्हा याविषयाची आवड असणाऱ्या साधकांना काही गोष्टी सुचवणे एवढाच माफक उद्देश येथे आहे.

तुम्ही जर  वर उल्लेख केलेल्या झगमगीत शब्दांच्या मुळाशी गेलात तर तुम्हाला एक साधे-सोपे पण अत्यंत महत्वाचे तत्व आढळेल - Reduce, Reuse, Recycle. तुम्ही जर प्राचीन काळाच्या योग्यांची किंवा संन्याशांची जीवनशैली अभ्यासली तर त्यात minimalism हा अविभाज्य घटक आढळतो. लज्जा रक्षणासाठी वस्त्र, दंड आणि कमंडलू एवढीच "संपत्ती" असलेल्या योगी-संन्यासी जनांचा वारसा भारताला लाभलेला आहे. एकदा का minimalism चा अंगीकार केला की वरील तीन गोष्टी आपोआप साधतात असे तुम्हाला आढळेल. वैराग्यशील संत-सत्पुरुषांच्या "साधी रहाणी उच्च विचारसरणी" चा काकणभर अंगीकार जरी आपल्याला जमला तरी तो फायदेशीर ठरेल. योग हा प्रामुख्याने शरीर-मनाचा विषय आहे. योगशास्त्र कर्मकांड विरहित असं शास्त्र आहे. हे जरी खरं असलं तरी बहुतेक साधक कोणत्या ना कोणत्या प्रकाराने कर्मकांडात्मक उपासनेचा आधार घेत असतात असं आपल्याला आढळेल. अगदी योगसाधना जरी म्हटली तरी त्यासाठी आसन, जपमाळ, दंड अशा काही "बाह्य" गोष्टींचा वापर केला जातो. भगवान शंकराच्या मंत्रयोगात जप साधनेबरोबरच होम-हवन सुद्धा आवश्यक घटक मानले गेले आहे.

भारतात प्राचीन काळापासून टिकाऊ गोष्टींना महत्व दिले गेलं आहे. Use and throw ही आधुनिक पद्धत आपण पाश्चात्य जगताकडे पहात शिकलेले आहोत. तुम्ही जेंव्हा योग साधनेसाठी किंवा उपासनेसाठी गोष्टी विकत घ्याल तेंव्हा त्या टाकाऊ पेक्षा टिकाऊ असू द्यात. एक उदाहरण देतो. समजा तुम्हाला योगासने आणि ध्यान-धारणा करायला आसन खरेदी करायचे आहे. आजकाल त्यासाठी "योगा मॅट" सर्रास वापरल्या जातात. अनेकवेळा या योगा मॅटस सिंथेटिक पदार्थापासून बनवलेल्या असतात. काही वर्षांच्या वापरानंतर त्या फाटतात आणि परत बदलाव्या कागतात. त्या ऐवजी जर तुम्ही मेंढीच्या लोकरीपासून बनवलेली घोंगडी वा तत्सम आसन मिळवलेत तर ते वर्षोनवर्षे टिकते. मधून मधून ऊन दाखवले आणि साफ केले की झालं. हाच प्रकार तुम्ही जपामालेच्या बाबतीत करू शकता. बाजारातून पाच-पन्नास रुपयाची माळ आणून ती दर काही वर्षांनी बदलण्यापेक्षा किंवा अनुष्ठान संपल्यावर जलप्रवाहित करण्यापेक्षा एकदाच चांदी किंवा पंचधातूमध्ये रुद्राक्षाची माळ करून घेतली तर ती आयुष्यभर पुरते. आजकाल बाजारात सेल वर चालणारे Digital Japa Counters  उपलब्ध आहेत. बरेच साधक जप मोजण्यासाठी ते वापरतात. त्यापेक्षा वर सांगितलेली टिकाऊ जपमाळ कितीतरी पर्यावरण स्नेही आहे. जपमाळ गुंडाळून ठेवायला प्लास्टिकची पिशवी किंवा प्लास्टिकचा डबा वापरण्यापेक्षा कापडी पिशवी किंवा स्टील, तांबे, पितळ, चांदी इत्यादी धातूंपासून बनलेला डबा वापरता येतो.

आपापल्या इष्ट देवतेची पूजा हा अनेक उपासनांमधील अविभाज्य घटक आहे. पूजा म्हटली की देवाला काहीतरी अर्पण करणं हे ओघाने आलेच. फुलं, पानं, फळ, अभिषेक, पंचामृत अशा अनेकानेक गोष्टींचा वापर पूजेमध्ये केला जातो. हा वापर करत असतांना कटाक्षाने जेवढा आवश्यक असेल तेवढाच करणे सहज शक्य आहे. एक उदाहरण देतो. बहुतेक सर्व शिवमंदिरांच्या प्रवेशद्वारापाशी दुधाच्या पाव-अर्धा लिटरच्या प्लास्टिकच्या पिशव्या विकणारे हमखास आढळतात. ह्या दुधापेक्षा घरूनच आवश्यक तेवढे दुघ-पाणी-पंचामृत वगैरेंचे मिश्रण धातुच्या बाटलीतून किंवा लोट्यातून नेता येऊ शकते. उगीचच ढीगभर फुले-पाने वाहण्यापेक्षा तीन-पाच-अकरा-एकवीस अशा संख्येने आवश्यक तेवढी वहाता येऊ शकतात.

विविध उपासनांमध्ये अत्यावश्यक मानल्या गेलेल्या अजून काही गोष्टी म्हणजे अगरबत्ती, धूप, लोबान, तेलाचे-तुपाचे दिवे, कापूर, होम-हवन वगैरे वगैरे. बाजारात मिळणाऱ्या अनेक उदबत्त्या ह्या रासायनिक पदार्थांपासून बनलेल्या असतात. अशा रासायनिक उदाबत्त्यांपेक्षा नैसर्गिक पदार्थांपासून बनलेल्या उदबत्त्या वापरता येतील का याचा विचार करावा. उगीचच जुडगाभर अगरबत्त्या लावण्यापेक्षा एक-दोनच लावल्या तर चालेल का ते पहावे. पारंपारिक पद्धतीचा धूप वापरता येतो का ते पहावे. आजकाल कोळसा विरहित धूपस्टिक मिळतात. त्या वापरून बघाव्यात. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावत असतांना आवश्यक तेवढेच "इंधन" घालावे. ज्योत जर अचूक प्रमाणात लावली तर तेवढ्याच तेलात-तुपात दिवा संपूर्ण साधनाकालात तेवत राहू शकतो. काही वेळा साधक घरी "अखंड ज्योत" स्थापना करतात. घरी अशी अखंड ज्योत लावण्यापेक्षा जवळच्या मंदिरात जाऊन तेथील अखंड-ज्योतीमध्ये तेल किंवा तूप अर्पण करता येईल का ते पहावे. कृत्रिम रासायनिक पद्धतीने बनलेला कापूर जाळण्यापेक्षा आवश्यक तेवढा देशी भीमसेनी कापूर वापरता येईल का ते पहावे. होम-हवन-अग्निहोत्र वगैरे करतांना आवश्यक त्या आकाराचे अग्निकुंड वापरावे आणि आवश्यक तेवढाच अग्नि प्रज्वलित होईल असे पहावे.

व्रत-वैकल्यांबरोबर पाळल्या जाणाऱ्या नेहमीच्या सरधोपट उपवासांबरोबरच मोबाईलचा उपवास, सोशल मिडीयाचा उपवास, खाजगी वाहनाचा उपवास, पंचतारांकित रहाणीचा उपवास असे कालसापेक्ष उपवास करता येतील का ते पहावे.

असो. वानगीदाखल येथे काही उदाहरणे दिली. आवड आणि इच्छा असेल तर तुम्हाला अशी ढीगभर उदाहरणे सापडतील. या छोट्या-छोट्या गोष्टींनी पर्यावरणावर प्रचंड प्रमाणात फरक पडणार नाही कदाचित पण तुमच्यात त्याबद्दल एक जाणीव निर्माण होईल. हळूहळू दैनंदिन आयुष्यात आपण केवढा फापटपसारा आपल्याभोवती गोळा केलेला आहे ते तुम्हाला जाणवू लागेल. मग दैनंदिन आयुष्यात शक्य तेवढ्या सर्व गोष्टी पर्यावरण स्नेही पद्धतीने करण्यात तुम्हाला रस वाटू लागेल.

प्राचीन नाथपंथात पार्वतीला उदयनाथ असं नामाभिदान आहे आणि तिला पृथ्वीस्वरुपा मानतात. पृथ्वीच्या आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पृथ्वीस्वरूपा जगदंबा सर्वांना सद्बुद्धी प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 18 November 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates