Untitled 1

योगसाधनेला पोषक सहा गुण

कोण्या एका गावात एक सोनार आपल्या पत्नी आणि मुलांसह रहात होता. एक दिवस नेहमी प्रमाणे तो आपल्या दैनंदिन कामकाजात व्यग्र होता. दुपारच्या जेवणाच्या वेळी काही निवांत क्षण अनुभवत असतांना जणू चमत्कार घडला. त्या सोनाराची जीभ अचानक उचलली गेली आणि टाळूला घट्ट चिकटली आणि त्याला खेचरी मुद्रा लागली. डोळे उफराटे होऊन शांभवी मुद्रा लागली. तो देहभान विसरला. समाधीत गेलेला त्याचा देह निश्चल लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे दिसत होता. म्हणता म्हणता ही गोष्ट गावात वाऱ्यासारखी पसरली. लोकं गोळा झाले. त्याच्या समाधिस्त देहाला नमस्कार करू लागले. हार-फुलांनी त्याचं शरीर भरून गेले. एक-दोन दिवस हा प्रकार सुरु होता. एका दुपारी सोनार अचानक झोपेतून जागा झाल्याप्रमाणे समाधीतून भानावर आला. त्याने आजुबाजुला पाहिले. मान झटकली आणि परत आपल्या बायको-मुलांमध्ये आणि भौतिक आयुष्यात रमून गेला.

रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेली वरील गोष्ट आपल्याला बरंच काही शिकवून जाते. योगाभ्यासी साधकांना सुद्धा साधायला दुष्प्राप्य अशी समाधी अवस्था त्या सोनाराला विनासायास प्राप्त झाली. जर केवळ शारीरिक स्थितीच्या मापदंडातून मोजायचे झाले तर त्याला खेचरी, शांभवी, समाधी सर्व काही साधले होते. पण शेवटी उपयोग काय झाला. समाधीतून जागं झाल्यावर परत तीच भौतिक सुखं आणि त्याचं भौतिक इच्छा-आकांक्षा यांमध्ये तो पुरता वेढला गेला.

सोनाराची अशी अवस्था होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्याने योग-अध्यात्म मार्गावर चालण्याची कोणतीही तयारी केलेली नव्हती. कोणतेही प्रयत्न न करता समाधी अवस्था त्याच्याकडे आयती चालून आली होती. परंतु त्याचे शरीर-मन त्या अवस्थेसाठी तयार नसल्याने समाधी त्याला फळली नाही. तो निवृत्ती मार्गावर जाण्याऐवजी पुन्हा प्रवृत्ती मार्गावरून आवडीने मिटक्या मारत वाटचाल करू लागला.

आपल्याला जर एखाद्या अवघड ट्रेकिंगला जायचे असेल तर आपण पूर्ण तयारीनिशी जातो. पाण्यात उडी मारण्यापूर्वी आपण नीट पोहायला शिकतो. वर्दळीच्या रस्त्यावरून वाहन चालवायचे असेल तर ड्रायव्हिंग नीट आत्मसात करतो. अगदी त्याचं प्रमाणे कुंडलिनी योगमार्गावर पाय ठेवण्यापूर्वी काही तयारी केली तर त्याचा फार उपयोग होतो. ही तयारी अशा साधकांना विशेषरूपाने आवश्यक आहे त्यांना कुंडलिनी योगमार्ग आपली जीवनशैली म्हणून स्वीकारायचा आहे. ज्यांना केवळ तणाव-मुक्ती, शारीरिक-मानसिक फिटनेस या दृष्टीने योगाभ्यास करायचा आहे त्यांची गोष्टच वेगळी. आपल्याला येथे पहिल्या प्रकारातील योगाभ्यासी साधकांचाच विचार करायचा आहे.

साधकासाठी नीती-नियम कोणते असं जर बघितलं तर सर्वप्रथम अष्टांग योगातील यम आणि नियम आठवतात. नीती-नियमांची तशी मांडणी तर आहेच परंतु येथे थोडी सुलभ आणि थेट मांडणी आपण विचारात घेऊ. ही मांडणी आदी शंकराचार्यां सारख्या दिग्गजाने सांगितली आहे. त्यामुळे या मांडणीचे महत्व वेगळे अधोरेखित करायला नको.

आदी शंकराचार्यांच्या मते योग-अध्यात्म मार्गाच्या साधकाकडे सहा गुण असणे आवश्यक आहे. या गुणांचे महत्व एवढे मोठे आहे की या गुणांना त्यांनी साधकाची "षट संपत्ती" असं म्हटलं आहे. आता हे सहा गुण कोणते तर - शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान.

शम म्हणजे मनातील इच्छा, आकांक्षा आणि भोगवासनांचे पूर्णतः शमन होणे. जोवर या गोष्टी प्रबळ आहेत तोवर योगाभ्यासी साधक प्रवृत्ती मार्गावरच भरकटत रहातो. त्याला भौतिक सुखांची खऱ्या अर्थाने नावड उत्पन्न होत नाही. कुंडलिनी अधोगामी बनून मनातील भौतिक इच्छांची पूर्तता करण्यातच त्याच्या दिवसाचा बहुतांश वेळ आणि उर्जा खर्ची पडत असतो.

दम म्हणजे इंद्रियांचे दमन. मनात इच्छा उत्पन्न झाली की ती पूर्ण करण्यासाठी मन ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांची मदत घेत असते. इंद्रियांचे चोजले पुरवण्याची सवय लागली की त्यातच सुख वाटू लागते. परत परत इंद्रिय सुखाचा तोच अनुभव घ्यावा असे वाटू लागते. शम आणि दम हे एकमेकाशी निगडीत आहेत हे सहज लक्षात येण्यासारखे आहे.

उपरती म्हणजे भौतिक गोष्टींच्या पलीकडे पाहण्याची वृत्ती. भौतिक सुखं उपभोगत असतांना सुरवातीला आनंद होतो परंतु विवेकशील योगसाधकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की त्या भौतिक गोष्टींत त्याचं मन रमेनासं होतं. या गोष्टी वरकरणी कितीही चांगल्या वाटल्या तरी त्या सर्वस्व होऊ शकणार नाहीत, पूर्णता देऊ शकणार नाहीत असा पक्का बोध त्याला होतो. हीच उपरती.

तितिक्षा म्हणजे आयुष्यातील सुखं-दुख:, चांगले-वाईट प्रसंग शांत चित्ताने, त्रागा न करता सहन करणे.

श्रद्धा हा गुण तर सर्वांनाच सुपरिचित आहे. वरकरणी वाटायला सोप्पा परंतु पाळायला अत्यंत कठीण असा हा गुण आहे.

समाधान शब्दाचा प्रचलित अर्थ सर्वांनाच माहित आहे. येथे समाधान म्हणजे एकाग्रता. योगमार्गावरून चालण्यासाठी जो एक प्रकारचा निश्चय, समर्पण किंवा फोकस असावा लागतो तो म्हणजे समाधान. आयुष्यातील अन्य गोष्टींनी विचलित न होता योगमार्गावर अग्रेसर होण्यासाठी हा गुण अत्यावश्यक ठरतो.

योगमार्गावर "क्रियायुक्तस्य सिद्धी" हे जे सूत्र सांगितले आहे त्यांतील "क्रिया" ही केवळ शारीरिक स्थरावर घडून उपयोगी नाही. त्या क्रियेला पोषक असे आंतरिक वातावरण असायला हवे. अन्यथा ती क्रिया कोरडी, पोकळ आणि निष्फळ ठरते. वरील सहा गुण अल्प प्रमाणात जरी आत्मसात करता आले तरी फार मोठं कल्याण साधता येते. योग-अध्यात्म मार्गावरचा प्रवास मग सुखमय होतो. योगाभ्यासी साधकांनी हे गुण आत्मसात करण्याचे मनोभावे प्रयत्न करावेत हेच श्रेयस्कर आहे.

असो.

शम-दमादी गुणांची प्राप्ती करण्यात जगदंबा कुंडलिनी सर्व योगाभ्यासी वाचकांना सहाय्यभूत होवो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 15 June 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates