Learn the royal path of Ajapa Yoga. Course conducted by Bipin Joshi in Thane. Read more...

Untitled 1

ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत

कालच्या म्हणजे २४ नोव्हेंबर २०१६ च्या दैनिक लोकसत्ता मध्ये एक बातमी वाचण्यात आली की सुमारे सव्वाचारशे वर्षांपूर्वीची ज्ञानेश्वरीची एक हस्तलिखित प्रत सापडली आहे. होळकर संस्थानातील रामजी यांनी लिहिलेली ही दुर्मीळ प्रत मराठी हस्तलिखित केंद्राकडे उपलब्ध झाली आहे.  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीनंतर लिहिलेली ही पहिलीच हस्तलिखित प्रत आहे म्हणून त्याला महत्व प्राप्त झाले आहे.

ही बातमी वाचत असतांना सहज आठवले की पावसच्या स्वामी स्वरुपानंदानीही अशी ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत तयार केली होती. आपल्या सद्गुरुंसाठी. त्यांच्या चरित्रात तसं काहीसं वाचल्याचं अस्पष्ट आठवतंय. आजच्या काळात असं काही हाताने लिहून काढणं जरा अनावश्यक वाटेल कारण आज प्रिंटींगचं तंत्रज्ञान फारच सुधारलं आहे. त्यात परत ऑनलाईन पब्लिशिंग आहेच.

जरा कल्पना की प्राचीन काळी जर कोणीतरी अशी हस्तलिखिते तयार करण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली नसली तर आज आपल्याला जुने साहित्य उपलब्धच झाले नसते. गंमत म्हणजे छपाईचा शोध लागल्यानंतर सुद्धा ही अशी हस्तलिखित करण्याची प्रथा बऱ्यापैकी सुरु होती. कारण त्यावेळी छापलेले ग्रंथ वाचायला विशेषतः नित्य पाठ किंवा पारायणासाठी वगैरे वापरायला लोकं बाचकत असत. त्यामुळे जाड कागद घ्यायचा आणि त्यावर बोरूने शाई वापरून सुवाच्च लेखन करायचं अशी प्रथा होती. खाडाखोड झाली तर सगळं पान पुन्हा. काही शब्द राहिले किंवा वाक्य चुकले तरी पुनर्लेखन आलंच.

पण ज्यांनी ज्यांनी अशा हस्तलिखित पोथ्या वा ग्रंथ तयार केले त्यांना त्यात नक्कीच समाधान वाटत असणार. आपल्या परंपरेचे ज्ञान-विज्ञान आपण जतन करतोय, आपल्या नंतरच्या पिढ्यांसाठी काहीतरी राखून ठेवतोय अशी भावना त्यात असणारच. अशा हस्तलिखित साहित्यामध्ये अभ्यासकांच्या दृष्टीने त्रासदायक एक गोष्ट घडत असते ती म्हणजे पाठभेद.

वेगवेगळ्या लेखकांनी, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या स्थळी लिहिलेल्या या प्रतींमध्ये १००% एकवाक्यता बऱ्याचदा नसते. मग अभ्यासकांना आणि संशोधकांना अशा अनेक प्रतींचा अभ्यास करून, त्यांची तुलना करून बरोबर पाठ कोणता ते ठरवावे लागते. बऱ्याचदा मूळ लेखकाने काय म्हटले असेल ते कालौघात बदलूनही जाते. काळपरत्वे काही गोष्टी घुसडल्या जाण्याचीही शक्यता असते. गुरुचरित्राच्या प्रतींबाबत असाच प्रकार घडलेला आपल्याला दिसतो.  श्री. रामचंद्र कामत यांनी गुरुचरित्राच्या अनेक प्रतींचा अभ्यास करून ते शुद्धरुपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुचरित्र अभ्यासणाऱ्या साधकांना ते माहित असेलंच. शिव-संहिता, हठयोग प्रदीपिका अशा अनेक योगग्रंथांच्या बाबतीतही हा प्रकार आढळून येतो. उदाहरणार्थ, सर्वसाधारणपणे उपलब्ध होणाऱ्या हठयोग प्रदिपिकेत चार अध्याय आहेत तर अन्य एका प्रतीत चक्क दहा अध्याय आहेत.

 असो. काल ती बातमी वाचनात आली म्हणून सहजच ही छोटी पोस्ट टाकली इतकंच.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 25 Nov 2016