Untitled 1

सोहं सरितेतील आत्मबोध

खळाळून वाहणारी नदी तुम्ही सर्वानीच पाहिली असेल. त्या नदीच्या पात्रात असंख्य जलधारा असतात. त्या जलधारांत असंख्य जलकण असतात. आपल्याला असं वाटतं की कालची ती नदी आणि आजची ती नदी एकच आहेत. परंतु विचार केला असता ध्यानी येईल की कालची गोष्ट तर खुप जुनी झाली, आत्ता काही मिनिटांपूर्वी असलेली ती नदी आणि आत्ता या क्षणी अस्तित्वात असलेली ती नदी या दोन खरंतर पूर्णतः भिन्न आहेत. त्या नदीतील पाणी प्रतिक्षण वाहात आहे. जुने पाणी वाहात जाऊन त्याची जागा नवीन जलधारा, नवीन जलबिंदू घेत आहेत. वरवर जर ती नदी जुनी भासत असली तरी ती नदी प्रतिक्षण नूतन आणि ताजीतवानी आहे. गंमत आहे की नाही! प्रतिक्षण नवीन असलेली ती नदी आपण अनादी काळापासून वाहात आहे असे म्हणतो.

पंचकोषांनी बनलेल्या मानवी पिंडाचे सुद्धा असेच नाही का?! आपण बाल्यावस्थेत असतांना आपले भरण-पोषणास आतुर असलेले शरीर जसजसं वाढीस लागते तसतसं ते कात टाकू लागतं. शरीरातील पेशी अहोरात्र बदलत असतात, त्वचा जुनी जाऊन नवीन येते, केस, नखं वगैरे गोष्टी सुद्धा बदलत असतात. म्हणजे आपला काही दिवसांपूर्वीचा देह आणि आत्ताचा देह हा भिन्न असतो. या पिंडात रहाणारा "मी" मात्र बदलत नाही. या "मी" चा देह अहोरात्र बदलत असतो पण देहात कोंडलेला "मी" मात्र या बदलांच्या पलीकडे असतो. जो प्रकार स्थूल शरीराचा तोच आपल्या उर्जेचा अर्थात प्राणमय कोषाचा. आपली बालपणीची उर्जा, तरुणपाणीची उर्जा, कालची उर्जा, आणि आत्त्तां या क्षणी असलेली उर्जा या सर्व भिन्न उर्जा आहेत. असं असलं तरी आपण आपली प्राणशक्ती एकच आहे असं मानतो. आपल्या मनातील विचारांची गतही काही वेगळी नसते. आपल्या मनात येणारे विचार क्षणोक्षणी बदलत असतात. विचारांचा पोत बदलत असतो. आपण मात्र आपलं मन जे काल होतं तेच आजही आहे असं मानत असतो.

शरीर, प्राण, मन, बुद्धी इत्यादी मानवी व्यक्तिमत्वाचे स्तर चंचल आणि परिवर्तनशील आहेत. त्यांच्या मध्ये स्थैर्य नाही. त्याना शाश्वत अस्तित्व नाही. परंतु या पंचकोषांमध्ये घडणारे बदल त्यांच्या पलीकडला "मी" साक्षीभावाने अनुभवत असतो. तो त्या "मी" वरील आवरणं बदलली तरी तो "मी" काही बदलत नाही. अध्यात्मात या "मी" ला अहं, जीव, आत्मा अशा थोड्याफार भिन्न अर्थछटा असलेल्या नावांनी ओळखलं जातं. नावे काहीही द्या पण हा "मी" कूटस्थ असतो एवढं मात्र खरं. या "मी" वरील सर्व आवरणे काढली की हा "मी" आणि "तो" एकच आहेत असं लक्षात येतं. तीच "सोहं" ची अनुभूती.

आपले श्वासोच्छ्वास तरी कुठे शाश्वत असतात. प्रत्येक श्वास वेगळा असतो. गंमत बघा. आता या क्षणी जो श्वास तुम्ही घेतला आहे तंतोतंत त्याच्या सारखा श्वास पुन्हा होणारा नसतो. प्रत्येक श्वास प्राणशक्तीचा एक वेगळा ठसा घेऊन जन्माला येत असतो. त्याच्या सारखा तोच. दुसरा होणे नाही. याच कारणाकरता अजपा गायत्रीचा भर असतो तो घडणारा प्रत्येक श्वास अनुभवण्यावर. जर एक श्वास चुकला तर तो पुन्हा कधीच अनुभवता येणार नसतो. एक श्वास अनुभवायचा राहिला तर तोच श्वास अनुभवण्याची ती संधी पुन्हा कधीच मिळणारी नसते. आपले श्वास-प्रश्वास जरी शाश्वत नसले तरी ते ज्या ऊर्जेमुळे घडत असतात ती उर्जा मात्र शाश्वत असते. कारण ती उर्जा त्या "मी" चीच असते. त्या उर्जेलाच योगशास्त्रात कुंडलिनी, चैतन्य, प्राणशक्ती, देवात्मशक्ती अशी नावे दिली जातात. "मी" आणि "मी ची शक्ती" हे अभिन्न आहेत. जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू. आपल्या वैचारिक सोयीसाठी आपण त्यांना भिन्न मानतो आणि भिन्न मानून त्यांचे निरुपण करतो परंतु प्रत्यक्षात त्यांत "अद्वय" आहे. अभिन्नत्व आहे. समस्त आगम-निगम-योग शास्त्रातील शिव-शक्ती रूपकाचा अभिप्रायही तोच आहे.

योगशास्त्रात परमेश्वराचा वाचक म्हणून ओंकार मानला गेला आहे. या ओंकारालाच "प्रणव" असंही म्हणतात. वेगवेगळ्या शास्त्रग्रंथांत ओंकाराच्या आणि प्रणवाच्या भिन्न-भिन्न अर्थछटा दाखवण्यात आल्या आहेत. शिवपुराणात प्रणव म्हणजे "कर्मक्षय करवून नवीन ज्ञान देणारा" असा एक अर्थ आहे. वर उल्लेखलेल्या "मी" वरील सर्व आवरणे काढण्याची प्रक्रिया म्हणजेच योगसाधना. योगसाधनेद्वारे "मी" वरील पुट काढली की दिव्यावरील काजळी काढली की तो जसा स्वच्छ नव्यासारख्या दिसतो तसाच हा "मी" सुद्धा "सोहं" ज्ञानाने झळाळून जातो. त्याला जणू "नवीन" ज्ञान मिळालेले असते. अजपा जप करता करता "सो" आणि "अहं" गळून पडले की उरतो तो ओंकार अर्थात कूटस्थ प्रणव. सोहं सरिता साधकाला आत्मबोध करून देते ती अशी.

योगमार्गावर नुकतंच पदार्पण केलेल्या अभ्यासकांची अशी भाबडी समजूत असते की कोणीतरी दुसरा या "मी" शी गाठभेट घडवून देईल. मग त्याचं अपेक्षेनी आपापल्या श्रद्धेनुसार ईष्ट देवतेची उपासना, संत-सत्पुरुषांची भक्ती वगैरे मार्ग चोखाळले जातात. खरी गंमत अशी की या "मी" ची गळाभेट घडवून देण्याचे सामर्थ्य फक्त "मी" मध्येच असते. अन्य मार्ग आंतरिक शुद्धी घडवून आणण्यासाठी सहाय्यक नक्कीच ठरतात परंतु असे असले तरी "मी" चे प्रत्यक्ष ज्ञान हे "मी" नेच प्राप्त करता येते. अन्य उपाय नाही. ज्यांना आपल्या अंतरंगातच "ईष्ट" दर्शन घडले आहे, ज्यांनी आंतरिक "सद्गुरूंशी" संवाद साधलेला आहे त्यांनाच हे मर्म कळेल.

या जगात काहीही शाश्वत नाही. सृष्टीच्या कणाकणातील बदलाचा आस्वाद घेत, दृढपणे कूटस्थी मन लावून मार्गक्रमण करणं एवढंच काय ते योगसाधक करू शकतो. "रमता जोगी बहता पानी" या उक्तीला अनुसरून कुल-कुंडलिनीच्या आशीर्वादाने आणि अजपा गायत्रीच्या उद्घोषाने योगमार्गावर अग्रेसर होणे हेच योगसाधकाचे कर्तव्य ठरते.

असो.

कुल-कुंडलिनीच्या साक्षीने घटीत होणारे सोहंरुपी श्वासांचे गाणे सर्व योगाभ्यासी वाचकांना मंत्रमुग्ध करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 23 November 2020