Ajapa Yoga : Mantra, Pranayama, Hand Mudras and Meditation for Kundalini Awakening by Bipin Joshi. Read more...
Untitled 1

गुरु आणि पौर्णिमा

 

समस्त योग-अध्यात्म शास्त्रात परमेश्वर हा शब्दांच्या पलीकडील आणि मानवी मनाने जाणण्यास अशक्य आहे असे ठामपणे प्रतिपादन केले आहे. त्यमुळे शास्त्रग्रंथांत परमेश्वराचे वर्णन त्याच्या गुणांद्वारे केले जाते. परमेश्वराचे गुण कोणते? -

अशब्द, अस्पर्श, अद्वय, अरूप, अरस, अव्यय, अगंध, अनादी, नित्य, अनंत, अभय, अभेद, अगोत्र, अवर्ण, अदृश्य, अचक्षु:श्रोत्र, अग्राह्य, अपाणिपाद, अवेद्य, नित्यशुद्धबुद्ध, मुक्त, असंग, सत्य, शाश्वत वगैरे वगैरे.

आता हे उघडच आहे की परमेश्वराचे हे गुण यथार्थपणे जाणणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडचे आहे. हे माहित असल्यामुळेच दयाळू परमेश्वराने सर्व साधकांसाठी एक छान सोय करून ठेवली. ती सोय म्हणजे सद्गुरू. सद्गुरू म्हणजे साधकाचे बोट धरून त्याला योगमार्गावर चालायला शिकवणारा मायबाप. सद्गुरू विषयी वारेमाप बोलण्यात काही अर्थ नाही कारण कितीही स्तुती केली तरी शब्द तोकडेच पडतात. म्हणूनच सिद्ध-सिद्धांत-पद्धतीच्या सहाव्या उपदेशात गोरक्षनाथ सांगतात - परमपद गुरुमय आहे.

गुरूपौर्णिमेचे विश्लेषण करतांना काही तज्ञांनी पौर्णिमा शब्दाचा संबंध फक्त ज्ञान किंवा प्रकाश असा लावलेला आहे. त्यात चुकीचं असं काही नाही पण मला मात्र पौर्णिमा या शब्दाचा योगगम्य अर्थ स्फुरतो. तो अर्थ थोडक्यात खालीलप्रमाणे -

कुंडलिनी योगशास्त्रात चंद्र आणि सूर्य यांना रूपकाच्या स्वरूपात फार महत्वाचे स्थान आहे. आज्ञा चक्र ते सहस्रार चक्र हा प्रामुख्याने "चंद्र प्रदेश" आहे. तर नाभि स्थान हे प्रामुख्याने सूर्याशी निगडीत आहे. सहस्रारातील चंद्र अमृत स्त्रवतो. ते अमृत सर्व शरीरभर पसरून शरीराचे पोषण करते अशी योगगम्य संकल्पना आहे. चंद्राने स्रवलेले हे अमृत नाभिस्थानी असलेला सूर्य भक्षण करतो आणि एका अर्थाने प्राणशक्तीच्या ह्रासास कारण ठरतो. त्यामुळे कुंडलिनी योगशास्त्राचा विचार करायचा झाला तर सोळा कलांनी युक्त असलेला चंद्र हा बारा कलांनी युक्त असलेल्या सूर्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो. आमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत आकाशातील चंद्राच्या सोळा कला दृष्टीस पडतात. तर शरीरातील चंद्राच्या सोळा कला अमृताचा वर्षाव करतात. ज्ञानेश्वरीत याच योगगम्य चंद्राची "सतरावी कला" उल्लेखली आहे. ती सतरावी म्हणजे "निजकला". योगशास्त्राच्या दृष्टीने चंद्र हा मानवी मनाचे प्रतिक आहे तर सूर्य हा निखळ आत्म्याचे प्रतिक आहे. चंद्राचा मानवी मनावर थेट परिणाम होतो हे सर्वज्ञात आहे. पौर्णिमेला चंद्र आपल्या पूर्ण स्वरूपात प्रकट होत असतो. त्यामुळे मानवी मनावर त्याचा सुपरिणाम घडत असतो. अनेक साधनांसाठी पौर्णिमा सुयोग्य मानली जाते ते ह्याच कारणाने. त्यामुळे पौर्णिमा म्हणजे अद्वय अमृत, निजस्वरूप, पूर्ण स्वरूप, शांती, ज्ञान तर खरंच पण कसं? तर चंद्रासारखी शीतलता देणारं. पोषण करणारं. मनाला प्रसन्न करणारं.

असो.

तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपापल्या गुरुचरणांशी एकनिष्ठ राहून सर्व साधक मार्गक्रमण करोत हीच शिवचरणी प्रार्थना.


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

बिपीन जोशी लिखित देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 19 Jul 2016Tags : योग अध्यात्म कुंडलिनी चक्रे