Untitled 1
अक्षय तृतीये निमित्त ध्यानसाधना
अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. अक्षय तृतीयेचे महत्व सर्वज्ञात
असल्याने त्या विषया अधिका काही सांगण्याची गरज नाही. अक्षय तृतीयेच्या शुभ
मुहूर्ताचे औचित्य साधून योग-ध्यानमार्गाची आवड असणारी मंडळी विशेष साधना आणि
सरावाचा श्रीगणेशा सुद्धा करत असतात. आज अशीच एक ध्यानसाधना सांगणार आहे. ही साधना
अगदी नवख्या लोकांसाठी नाही. ज्यांना कुंडलिनी योगशास्त्राची प्राथमिक माहिती आहे आणि
ज्यांनी ध्यान-धारणेचा काही काळ तरी अभ्यास केलेला आहे अशा लोकांसाठी प्रामुख्याने
ही साधना आहे.
खरं तर अक्षय तृतीयाचा संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो परंतु हा ध्यानाभ्यास
असल्याने तो अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे ३ मे २०२२ रोजी सकाळी साडेपाच ते सहा च्या दरम्यान सुरु करून सात ते साडेसात असा दीड तास
पर्यंत तरी करावा. सर्व प्रथम सांब सदाशिवाची जगदंबा आणि गणेशा सहित यथाशक्ती पूजा करावी. त्या जोडीला आदी शंकराचार्यांनी रचना केलेले शिव
मानस पूजा स्तोत्र अर्थासहित पठण करावे. त्यांतील योगगर्भ अर्थाकडे विशेष लक्ष
द्यावे.
त्यानंतर कमीतकमी दहा वेळा नाडीशोधन प्राणायाम करावा. काही
क्षण स्तब्ध बसून मनाला अंतरंगात विहार करू द्यावे.
त्यानंतर ब्रह्म ग्रंथीवर ध्यान लावून रुद्राक्षाच्या माळेवर
श्रीशिवपंचाक्षर किंवा श्रीशिवषडाक्षर मंत्राचा तीन माळा जप
करावा. जप करत असतांना चित्त शक्य तितके शांत आणि अविचल ठेवण्याचा प्रयत्न करावा.
असं समजा की हा तीन माळा जप करण्यासाठी तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे एवढा वेळ
लागलेला आहे. आता जपमाळ बाजूला ठेऊन ब्रह्म ग्रंथीवर ध्यान धरत तेथेच पंधरा मिनिटे
अजपा जप करावा.
त्यानंतर पुन्हा जपमाळ हातात घ्यावी आणि ध्यानाचे केंद्र ब्रह्म ग्रंथीवरून वर
विष्णू ग्रंथीवर न्यावे. येथेही आगोदर प्रमाणे तीन माळा
जप करावा. जप झाल्यावर माळ बाजूला ठेऊन द्यावी आणि पंधरा मिनिटे
विष्णू ग्रंथीवर अजपा जप करावा.
आता पुन्हा जपमाळ हाती घेऊन ध्यानाचे केंद्र रुद्र ग्रंथीवर
न्यावे. येथेही श्रीशिवपंचाक्षर किंवा श्रीशिवषडाक्षर मंत्राचा तीन माळा जप
करावा. जप झाल्यावर माळ बाजूला ठेऊन द्यावी आणि पंधरा मिनिटे रुद्र ग्रंथीवर
अजपा जप करावा.
अशा प्रकारे साधारणपणे ब्रह्म ग्रंथी ३० मिनिटे + विष्णू ग्रंथी ३० मिनिटे +
रुद्र ग्रंथी ३० मिनिटे असा दीड तासाचा हा अभ्यास होईल.
ध्यानाभ्यास संपल्यावर परत दहा वेळा नाडीशोधन प्राणायाम करावा.
आसनावरून लगेच उठू नये. दहा-पंधरा मिनिटे शांतपणे मौन पाळत तसेच बसून राहावे.
त्यानंतर साधनेला विराम द्यावा. जर सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळी ही साधना
करणे शक्य झाले तर उत्तमच. अक्षय तृतीयेचे महत्व लक्षात घेता दिवसभर उठता-बसता
नामस्मरण स्वरूपात सुद्धा श्रीशिवपंचाक्षर किंवा श्रीशिवषडाक्षर मंत्राचा जप तुम्ही
करू शकता.
ब्रह्म ग्रंथी, विष्णू ग्रंथी आणि रुद्र ग्रंथी यांचे भेदन हा एक स्वतंत्र आणि
विस्तृत विषय आहे. येथे एवढे लक्षात घेणे पुरेसे आहे की या ग्रंथींचे स्वतःचे असे
काही गुणविशेष आहेत. वरील साधनेने या ग्रंथीत्रयीचे अवगुण कमी होऊन त्यांचे उत्तम
गुण प्रकट होण्यास मदत होते.
परत एकदा सांगतो की हा अभ्यास नवख्या साधकांसाठी नाही. ज्यांना ध्यानाभ्यासाचा
थोडातरी दैनंदिन सराव आहे त्यांनाच ही साधना प्रामुख्याने आवडेल आणि उपयोगी
पडेल. नवख्या साधकांनी आपापल्या इष्ट देवतेच्या मंत्राचा जप आणि त्यानंतर अजपा जप
असा ध्यानाभ्यास केल्यास तो त्यांना अधिक सुलभ आणि सुखकारक वाटेल.
असो.
ब्रह्म ग्रंथी, विष्णू ग्रंथी आणि रुद्र ग्रंथींचा वेध घेत थेट सहस्राराकडे
झेपावणारी जगदंबा कुंडलिनी सर्व वाचकांना "अक्षय योगज्ञान" प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला
विराम देतो.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो
की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे.
अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम