Untitled 1

इच्छापूर्ती मंत्र आणि प्रत्यक्षीकरण मंत्र

भारतीय जनमानसावर प्राचीन काळापासूनच मंत्र आणि मंत्रशक्ती यांचा एक अद्भुत पगडा बसलेला आपल्याला दिसून येतो. आजच्या विज्ञानयुगातही तो कमी झालेला दिसत नाही. अध्यात्ममार्गावर बहुतेक साधकांची पहिली साधना काय असते तर कोणत्यातरी मंत्राचा जप करणे.  घरात अथवा देवळात अशी जपमाळा फिरवणारी मंडळी आपण नेहमी पहातो. आता या मंत्रांनी खरोखर काही फायदा होतो का हा ज्याच्या त्याच्या श्रेद्धेचा आणि अनुभवाचा भाग आहे.

मंत्राशास्त्रानुसार मंत्रांची संख्या ७० करोड आहे. जे काही मंत्र भारतीय अध्यात्मशास्त्रात सर्रासपणे वापरले जातात त्यांच्याकडे लक्ष टाकल्यास आपल्याला त्यांची विभागणी ढोबळमानाने दोन प्रकारात करता येते. त्यांतील पहिला प्रकार म्हणजे इच्छापूर्ती करणारे मंत्र आणि दुसरा प्रकार म्हणजे देवतेचे दर्शन अथवा प्रत्यक्षीकरण करवणारे मंत्र.

पहिल्या प्रकारातील मंत्र सर्वसामान्य लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. या मंत्रांनी जापकाच्या मनोकामनांची इच्छापूर्ती होत असल्याने मंत्रांचा हा प्रकार साधकांना आवडावा यात नवल नाही. नुकतीच दिवाळी होऊन गेली. अनेक अध्यात्म विषयाला वाहिलेले दिवाळी अंक तुम्ही कदाचित चाळले असाल. त्यांमध्ये हमखास आढळणारे सदर म्हणजे लक्ष्मीप्राप्ती करता मंत्र, शाबर मंत्र, स्तोत्रं वगैरे वगैरेंचा संग्रह. असे बहुतेक सगळे मंत्र हे इच्छापूर्ती मंत्र असतात. प्रत्येक मंत्राचे एक दैवत असते. इच्छापूर्ती मंत्रांनी भौतिक इच्छांची पूर्ती व्हायला मदत होते परंतु मंत्रदेवतेचे दर्शन किंवा ज्याला मंत्रशास्त्रात प्रत्यक्षीकरण म्हणतात ते काही होत नाही. मंत्रदेवता साधकाची इच्छापूर्ती करते पण साधकाला दर्शन देऊन आपली स्थायी प्रसन्नता प्रदान करत नाही.

दुसऱ्या प्रकारचे जे मंत्र असतंत त्यांमध्ये विशिष्ठ भौतिक इच्छा ही गौण असते. मंत्रदेवतेचे दर्शन प्राप्त करणे अर्थात त्याचे प्रत्यक्षीकरण करवणे हा प्रधान भाग असतो. त्या दैवतेने दर्शन दिल्यावर आशिर्वाद मागणे किंवा काही इच्छा असल्यास ती प्रगट करणे असा प्रकार या मध्ये असतो. मंत्र देवतेचे प्रत्यक्षीकरण हा अर्थात वाटतो तेवढा सोपा भाग नाही. मंत्रदेवता साधकाची परीक्षा घेते, साधनेत बरीच विघ्न येतात. वेळही बराच लागतो. पण खरा निश्चयी साधक हे सर्व हसत सहन करतो. आपल्या इष्ट देवतेचे दर्शन आणि प्रसन्नता हेच त्याच्यासाठी महत्वाचे असते.

नाथ पंथांत लोकप्रिय असलेले शाबरी मंत्र पाच प्रकारात विभागले गेलेले आहेत. ते पाच प्रकार म्हणजे प्रबल शाबर, बर्भर शाबर, बराटी शाबर, डार शाबर आणि अढैय्या शाबर. यांतील पहिले तीन प्रकारचे शाबर मंत्र हे इच्छापूर्ती मंत्र या प्रकारात मोडतात तर उर्वरित दोन हे प्रत्यक्षीकरण या प्रकारात मोडतात. विस्तारभयास्तव येथे फार खोलात जात नाही कारण शाबर मंत्रांचे वर्गीकरण हा काही आपला आजचा विषय नाही.

जर श्रेष्ठत्वाचा विचार करायचा झाला तर प्रत्यक्षीकरण मंत्र हे इच्छापूर्ती मंत्रांच्या तुलनेने श्रेष्ठ ठरतात. ज्यांना केवळ भौतिक इच्छांसाठी साधना करायची आहे त्यांची गोष्टच वेगळी. अध्यात्ममार्गावर नवीन साधकांनी जप मंत्राची निवड करतांना आपण नक्की कशासाठी जपसाधना करत आहोत ते लक्षात घ्यावे. अन्यथा या दोन प्रकारच्या मंत्रांत गल्लत होऊ शकते. इच्छापूर्ती मंत्र हजारो लाखो वेळा जरी जपला तरी तो देवतेचे प्रत्यक्षीकरण काही घडवू शकत नाही. परिणामी साधकाच्या पदरी निराशाच पडते.

असो.

मंत्र, मंत्रशक्ती आणि मंत्रदेवता यांचा आशीर्वाद आणि कृपाप्रसाद सर्व वाचकांना लाभो या सदिच्छेसह लेखणीला येथेच विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 19 Nov 2018
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates