Untitled 1

पौर्णिमा आणि अमावास्या

अध्यात्म जगतात पौर्णिमा आणि अमावास्या यांचं आपलं असं एक स्थान आहे. सामान्य माणसांच्या दृष्टीने पौर्णिमा म्हणजे शुभ आणि अमावास्या म्हणजे अशुभ असं काहीसं समीकरण बनलेलं असतं. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राचं सौंदर्य त्याला शुभ वाटतं तर काळ्याकुट्ट अमावास्येला तो अशुभ, भुतखेतं, तंत्र-मंत्र वगैरे गोष्टींशी जोडत असतो.

आता जे तामसी वृत्तीचे लोकं असली निषिद्ध कृत्य करतात त्यांना त्याचं फळही तसचं मिळतं. योगमार्गावर अशा गोष्टींचा निषेध असल्याने त्या विषयात फार खोलात जायची आपल्याला गरज नाही. ज्ञानेश्वरीतील खालील ओव्या पुरेशा बोलक्या आहेत :

मनें वाचा करणीं । जयांचीं भजनें देवांचिया वाहणीं । ते शरीर जातिये क्षणीं । देवचि जाले ॥
अथवा पितरांचीं व्रतें । वाहती जयांचीं चित्तें । जीवित सरलिया तयांतें । पितृत्व वरी ॥
कां क्षुद्रदेवतादि भूतें । तियेचि जयांचि परमदैवतें । जिहीं अभिचारिकीं तयांतें । उपासिलें ॥
तयां देहाची जवनिका फिटली । आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली । एवं संकल्पवशें फळलीं । कर्में तयां ॥

भावार्थ - मन, वाचा आणि इंद्रियांनी जे इंद्रादी देवाना भजतात ते मृत्युनंतर त्या त्या देवतेला जाऊन मिळतात. ज्यांच्या मनाने पितरांची व्रते घेतलेली असतात ते जीवदशा संपल्यावर पितृलोकाला प्राप्त होतात. जे लोकं भूत-खेतं, क्षुद्र दैवते यांची उपासना करतात किंवा जारण-मारणादी निषिद्ध अभिचार कर्मे करतात त्यांच्या देहाचा पडदा पडताक्षणी त्यांना भूतयोनी किंवा पिशाचयोनी प्राप्त होते. याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या संकल्पाप्रमाणे त्यांना मरणोपरांत ते ते फळ प्राप्त होते.

असो.

नाथ विज्ञानानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक मानला गेला आहे. नाथ तत्वज्ञानानुसार चंद्राच्या सोळा दृश्य कला असून सतरावी निजकला आहे. सोळा कलांनी युक्त चंद्र, बारा कलांनी युक्त सूर्य आणि दहा कलांनी युक्त अग्नि याच देहात विराजमान आहे. या संकेतांचा नाथ विज्ञानात फार खोल विचार केलेला आपल्याला दिसतो. येथे फार खोलात जायचे कारण नाही पण चंद्राच्या या दोन अवस्था - पौर्णिमा आणि अमावास्या - ह्या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्याला जरी चंद्र वेगवेगळ्या कालांद्वारे दृष्टीगोचर होत असला तरी तो "पूर्ण" असतोच... आणि चंद्र आपले "अमृत" शिंपडत असतोच.

पौर्णिमा ते अमावास्या आणि अमावास्या ते पौर्णिमा म्हणजे जणू उत्पत्ति आणि लय याचा मनोहारी खेळाचा संकेत आहे. अमावास्या रुपी निर्गुण निराकार शिव हळू हळू साकार होऊन जगदाभास निर्माण करतो. पौर्णिमेला या खेळाचा सृजनात्मक एक डाव पूर्ण होतो. मग विलयाचा डाव सुरु. असे असंख्य डाव मांडले जातात या चार युगांच्या चौकडीत. योग्यांच लक्ष असते ते या खेळाला ओलांडून त्या पलीकडच्या परमपदापर्यंत पोहोचणं. गंमत बघा - योग पंथाचे मूळ गुरु भगवान आदिनाथ आणि अवधूत दत्तात्रेय. दत्तात्रेयांचा जन्म पौर्णिमेचा आहे आणि भगवान शंकराचा "महाकाल" अवतार अमावास्येशी जवळीक साधणारा आहे.

हे सगळं सांगण्याच कारण हे की आज सोमवती अमावास्या आहे. आज सर्वच शिव मंदिरांत दर्शनाची गर्दी असते. मनाचा आणि भावनांचा कारक चंद्र आणि तो चंद्र धारण करणारा चंद्रशेखर यांच्यापुढे आज नतमस्तक होण्यास विसरू नका.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 18 Dec 2017
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates