Untitled 1

ताणतणावांपासून मुक्तीसाठी व्हेगस तंत्रिका (Vagus Nerve)

मागील लेखात आपण आनंदाचा D.O.S.E. म्हणजे काय ते जाणून घेतले. आनंदाची प्राप्ती ही जर नाण्याची एक बाजू असेल तर त्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे दु:खांपासून निवृत्ती. सुखं आणि दु:खं ही मानवी आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. आजकालच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनशैलीमुळे मानसिक ताणताणाव, चिंता, काळज्या इत्यादी गोष्टींनी माणूस ग्रासून गेला आहे. त्याच्या सुखाचे पारडे हलके होऊन दु:खाचे पारडे जड होऊ लागले आहे. त्यामुळे दु:खांच्या निवृत्तीसाठी प्रथम ताणतणावांपासून मुक्ती आवश्यक आहे हे उघड आहे. पुढे जाण्याआधी प्रथम मानसिक ताणतणाव किंवा स्ट्रेस निर्माण कसा होतो ते थोडक्यात जाणून घेऊया.

जेंव्हा आपल्याबरोबर एखादी अप्रिय, दु:खद किंवा धोकादायक गोष्ट घडते तेंव्हा मेंदूतील Amygdala  नामक एक विशिष्ठ भाग वेगाने सक्रीय होतो. मेंदूच्या ह्या भागाचे कार्य म्हणजे शरीराला येऊ घातलेल्या संकटाशी लढायला तयार करणे. या तयारीचाच एक भाग म्हणून तो काही विशिष्ठ रसायने सोडण्याची आज्ञा करतो. विशेषतः Adrenaline आणि Cortisol यांचा त्यात समावेश होतो. या हार्मोन्सच्या मदतीने तीन महत्वाच्या गोष्टी घडतात. पहिली म्हणजे श्वसन वेगावेगाने होऊ लागते. शरीराला तयार करायचे म्हणजे ऑक्सिजन जास्त लागणार. त्यामुळे श्वास वेगावेगाने होऊ लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे हृदयाचे ठोके वेगावेगाने होऊ लागतात. शरीराला तयार करायचे म्हणजे शरीरातील विविध स्नायुंना रक्त जास्त प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी हृदयाला जास्तवेळा पपिंग करणे गरजेचे ठरते आणि म्हणून हृदयाची धडधड वाढते. तिसरी गोष्ट म्हणजे शरीराचा रक्तदाब वाढतो. स्नांयुना रक्त मोठ्या प्रमाणात वेगाने पुरवण्यासाठी ते अधिक दाबाने प्रवाहित करणे आवश्यक असते. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढते.

आता गंमत बघा. वरील सर्व गोष्टी शारीरिक किंवा बाह्य संकटांसाठी योग्य आहेत. समजा तुम्ही रस्त्याने जात आहात आणि समोरून एखादे वाहन वेगाने येत आहे. त्या वाहनाला चुकवण्यासाठी शरीराला वरील तीनही गोष्टींची गरज भासते जेणेकरून तुम्ही पटकन उडी मारून त्या वाहनाला चुकवू शकता. परंतु गडबड उडते ती मानसिक संकटांमुळे. जेंव्हा तुम्ही ऑफिस मधील मिटिंग बद्दलच्या काळजीत असता तेंव्हा शरीराला वाटतं की यावेळी सुद्धा काहीतरी अप्रिय घडणार आहे आणि ते वरील हार्मोन्स, जलद श्वास, हृदयाची धडधड वाढवणे, रक्तदाब वाढवणे वगैरे गोष्टी करू लागतं. गोंधळ हा असतो की मानसिक संकटांसाठी या सगळ्या शारीरिक तयारीची गरज नसते. आधुनिक ताण-तणावांनी भरलेल्या जीवनशैलीमुळे अशी मानसिक "संकटे" पावलो-पावली येत असतात. परिणामी मेंदू कायम "अलर्ट मोड" मध्ये रहातो. श्वसन आपली नैसर्गिक गती विसरून वेगाने (Rapid breathing) आणि उथळ (Shallow breathing) स्वरूपात होऊ लागते. ताणतणाव आणि उच्च रक्तदाब (High Blood Pressure) यांचा संबंध हा असा आहे. कित्येकदा तर लोकांना शरीरातील हे बदल जाणवतही नाहीत. जेंव्हा हे बदल एखाद्या रोगाचे किंवा व्याधीचे स्वरूप धारण करतात तेंव्हा मग त्यांना या सगळ्याची जाणीव होते.

वरील वर्णनात मेंदू, श्वसन संस्था, आणि हृदय यांच्यामध्ये आवश्यक त्या सूचनांची आदान-प्रदान करण्यात Vagus Nerve अर्थात व्हेगस तंत्रिकेचा महत्वाचा वाटा असतो. या लेखात आपण Vagus Nerve ला आपल्या सोयीसाठी "व्हेगस नाडी" असं म्हणणार आहोत. तर ही व्हेगस नाडी आपल्या Parasympathetic Nervous System चा एक भाग आहे. या नाडीचा उगम मेंदूच्या मुळापासून म्हणजे Medulla Oblongata पासून होतो आणि ती थेट आपल्या पोटापर्यंत गेलेली असते. तिच्या मार्गात व्हेगस नाडी मुखाचा आणि जिभेचा मागील भाग, अन्ननलिका, गळा, फुप्फुसे, हृदय, लिव्हर, उदर अशा अनेक भागांतून जाते. व्हेगस नाडीची अनेकानेक कार्ये आहेत. त्यांतील सगळीच काही येथे विस्ताराने देता येणे शक्य होणार नाही. परंतु योगसाधनेच्या दृष्टीने काही महत्वाची कार्ये थोडक्यात जाणून घेणे फायद्याचे ठरेल.

व्हेगस नाडी श्वसन प्रक्रिया नियंत्रित करते. ती हृदयाचे कार्यसुद्धा नियंत्रित करते. अन्नग्रहण केल्यावर आपल्याला जी पोट भरल्याची जाणीव होते त्यात व्हेगस नाडीचा हात असतो. पाचन क्रियेमध्ये सुद्धा व्हेगस नाडीचा सहभाग असतो. मागच्या लेखात आपण ऑक्सीटोसिनचे महत्व आणि कार्य जाणून घेतले.  त्या ऑक्सीटोसिनच्या निर्मितीत आणि पर्यायाने "दीर्घकालीन आनंदात" सुद्धा व्हेगस नाडी महत्वाची भूमिका बजावत असते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शरीर-मनाला शिथिलता देणे, मनाला चिंता, ताण-तणावांपासून मुक्त करणे, मनात आरोग्यतेच्या भावनेला चालना देणे अशी कार्येसुद्धा व्हेगस नाडी करत असते. जर काही कारणाने व्हेगस नाडीच्या कार्यात अडथळा आला तर वरील सर्व गोष्टींवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे ध्यानाभ्यास करणाऱ्या कोणालाही व्हेगस नाडीकडे लक्ष देणे अगत्याचे ठरते.

ईश्वराने मानवी पिंडाची रचना इतक्या अद्भुतपणे केलेली आहे की त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता त्यामध्ये आहे. प्राचीन योग्यांना हे इंगित चांगलेच माहित होते. त्यांनी आनंदासाठी बाह्य जगताकडे हात पसरण्यापेक्षा आपल्या अंतरंगातील आनंदाचा डोह शोधला आणि त्यात मनसोक्त विहार केला. मानव पिंडातून ब्रह्मांडाकडे जाणारा गूढ योगगम्य मार्गही त्यांनी शोधून काढला. त्यांचा मानव पिंडाचा अभ्यास एवढा गाढा होता की आपल्याकडे प्रचलित असलेल्या पारंपारिक योगासने, प्राणायाम, ध्यान वगैरेंच्या अभ्यासात व्हेगस नाडीला आवश्यक ती चालना देण्याचे सामर्थ्य उपजतच आहे असे आपल्याला आढळून येते. अनेक शास्त्रीय प्रयोगांतून आणि निरीक्षणांतून ते सिद्ध झाले आहे. या व्यतिरिक्त संथ आणि दीर्घ श्वसन, स्वर यंत्राशी संबंधित क्रिया जसं गाणे म्हणणे किंवा स्वतःशीच काही गुणगुणणे, व्यायाम, मसाज अशा क्रियांनी सुद्धा व्हेगस नाडी सक्रीय होत असते. या सगळ्याच्या जोडीला आहाराच्या माध्यमातून सुद्धा व्हेगस नाडीचे आरोग्य राखता येते.

तुमच्यापैकी जे योगाभ्यासक नित्य-नेमाने अजपा ध्यान करत आहेत त्यांना कदाचित असे कुतूहल वाटेल की अजपा जप आणि व्हेगस नाडीचा काही संबंध आहे का? याला उत्तर अर्थातच होकारार्थी द्यावे लागेल. अजपा ध्यान आणि व्हेगस नाडी यांचा अगदी घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळेच अजपा जप जर तुम्ही योग्य प्रकारे करत असाल तर अगदी थोड्याच वेळात मन शांत करतो असं तुम्हाला आढळेल. अजपा ध्यान आणि अजपा ध्यानाची काही व्हेरीएशंस व्हेगस नाडीला नक्की कशाप्रकारे प्रभावित करतात हा एका वेगळ्या लेखाचा विषय होईल. त्यामुळे त्याबद्दल पुन्हा कधीतरी विस्ताराने जाणून घेऊ.

असो.

आज श्रीदत्तजयंती साजरी होत आहे. तुम्ही सर्व वाचकमंडळी आपापल्या श्रद्धेनुसार मोठ्या उत्साहाने श्रीदत्तजयंती साजरी करत असाल अशी खात्री आहे. लवकरच चालू वर्ष काळाच्या कराल मुखात लुप्त होऊन आशा-आकांक्षांनी भरलेले एक नवीन वर्ष उदयास येणार आहे. नवीन वर्षात नव्या उमेदीने योगमार्गावर वाटचाल करण्यासाठी तुम्ही छानसा "अॅक्शन प्लान" तयार कराल अशी आशा आहे.  त्यासाठी तुम्हाला खुप खुप योगमय शुभेच्छा.

श्वास आणि प्रश्वासांच्या माध्यमातून स्वयमेव व्यक्त होणारी कुल-कुंडलिनी आणि अजपा गायत्री सर्व योगाभ्यासी वाचकांना मनःशांतीचा "व्हेगस" मार्ग दाखवो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 29 December 2020