Untitled 1

योगक्रिया युक्त साधकालाच सफलतेची प्राप्ती

आपण जेंव्हा एखादे कार्य हाती घेत असतो तेंव्हा आपल्या मनात काहीतरी उद्दिष्ठ असते. त्या उद्दिष्ठाच्या पुर्तीकडे लक्ष ठेऊन आपण ते कार्य करत असतो. मधून मधून आपण त्या कार्याचे अवलोकन करत असतो आणि ठरवलेल्या उद्दिष्ठाच्या आपण किती जवळ पोहोचलो आहोत किंवा भरकटले आहोत त्याची चाचपणी करत असतो. सर्वसामान्य भौतिक गोष्टींच्या दृष्टीने हा प्रकार ठीक आहे कारण बहुतेक वेळा आपल्याला आपले उद्दिष्ठ नीट माहित असते.

योगमार्गावर सुद्धा हा प्रकार लागू पडतो. असं समजा की तुम्ही मानसिक ताणतणावां पासून मुक्त होण्याकरता ध्यान-धारणा करत आहात. तुम्हाला माहित असतं की तुमचं उद्दिष्ठ काय आहे. ज्या अवस्थेप्रत तुम्हाला पोहोचायचे आहे ती चिंतामुक्त अवस्था तुम्ही तुमच्या पूर्वायुष्यात थोड्याबहुत प्रमाणात प्रत्यक्ष अनुभवलेली असते. परंतु जेंव्हा तुम्ही आध्यात्मिक प्रगती करता योगाभ्यास करत असता तेंव्हा थोडी गंमत उडते. आध्यात्मिक प्रगतीची लक्षणे म्हणून जी काही सांगितली जातात त्यांतील बहुतेक लक्षणे साधकाने आजवर स्वतः कधीच अनुभवलेली नसतात. त्यात परत आत्मसाक्षात्कार, मुक्ती, समाधी वगैरे वगैरे गोष्टी तर एवढ्या क्लिष्टपणे सांगितलेल्या असतात की आपल्या साधनेचे नक्की उद्दिष्ठ काय याचे सुस्पष्ट चित्र साधकाच्या डोळ्यासमोर अजिबात नसते. फक्त abstract आणि vague गोष्टींचं आणि संकल्पनांच भेंडोळ त्याच्या मनात पडलेलं असतं. थोडक्यात साधक आपली साधना अशा काही ऐकीव-वाचीव गोष्टींच्या प्राप्तीसाठी करत असतो ज्यांचा त्याला स्वतःला काडीचाही अनुभव नाही.

गंमतीची गोष्ट अशी की हा प्रकार बहुतांशी सर्वच नवीन साधकांचा होत असतो. त्यात चुकीचे किंवा वाईट वाटण्यासारखे काही नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो की "आप्तवाक्य" म्हणून जे उद्दिष्ठ त्याने स्वीकारले आहे त्याचा तर त्याला अनुभव नसतो मग त्या उद्दिष्ठाचा पाठपुरावा कसा काय करणार?

साधकांची ही अडचण लक्षात घेऊन जुन्या काळच्या योग्यांनी एक उत्तम उपाय सांगितला आहे. तो खालीलप्रमाणे -

क्रियायुक्तस्य सिद्धिः स्यादक्रियस्य कथं भवेत्।
न शास्त्रपाठमात्रेण योगसिद्धिः प्रजायते॥

सोप्या शब्दांत याचा अर्थ असा की जो योगसाधक "क्रियायुक्त" असतो त्यालाच सिद्धी मिळते. जर साधकाने "क्रिया" केली नाही तर सिद्धी कशी मिळणार? केवळ शास्त्र ग्रंथांचे वाचन करून योगसिद्धी मिळणे शक्य नाही.

वरकरणी हा श्लोक तसा सामान्य वाटतो पण त्यात फार खोल अर्थ दडलेला आहे. प्रथमतः येथे "क्रियायुक्त" असा शब्दप्रयोग केलेला आहे. योगशास्त्रात क्रिया या शब्दाला स्वतःचा असा अर्थ आणि महत्व आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शरीर-प्राण-मन यांच्या सहाय्याने आध्यात्मिक प्रगतीकरता केलेली विशिष्ठ यौगिक साधना किंवा प्रक्रिया म्हणजे "क्रिया". आता येथे नुसती क्रिया करा असं म्हटलेलं नाही तर क्रियायुक्त व्हा असं सांगितलेलं आहे. योगक्रिया नुसती वरवर करून चालणार नाही तर ती अंगात खोलवर भिनळी पाहिजे. नसानसांत वाहिली पाहिजे. तेंव्हाच त्या योगक्रीयेने साधक "युक्त" झाला असे म्हणता येईल.

येथे सिद्धी शब्दाने अणिमा, गरिमा वगैरे अष्टमहासिद्धी सांगितलेल्या नाहीत. येथे सिद्धी म्हणजे सफलता. प्रत्येक साधनेची काही फलश्रुती असते. ती फलश्रुती मिळू लागली की ती साधना साधली किंवा सिद्ध झाली असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, नाडीशोधन प्राणायामाची फलश्रुती आहे नाडीशुद्धी. जेंव्हा शरीरातील ७२ हजार नाड्या सुद्ध होतील तेंव्हा नाडीशोधन प्राणायाम सिद्ध झाला किंवा साधला असं आपल्याला म्हणता येईल. जो साधक योगक्रियांचा आश्रय घेऊन रहातो त्यालाच त्या-त्या साधनांमध्ये सिद्धी अर्थात सफलता मिळते. जर साधकाने योगक्रिया अंगीकारल्याच नाहीत तर अर्थातच त्याला सफलता मिळणे शक्य नाही.

"क्रियायुक्त व्हा" या संदेशाचा प्रथमदर्शनी ध्वनीत होणारा अर्थ वर सांगितला. त्याला दुसरा अधिक सूक्ष्म अर्थ सुद्धा आहे. साधक क्रियायुक्त तेंव्हाच होऊ शकतो जेंव्हा त्याचे सारे लक्ष आपल्या साधावेत आहे. साधनेच्या फळावर लक्ष देऊन उपयोग नाही कारण त्याला त्याची अजूनपर्यंत अनुभूतीच आलेली नाही. त्यामुळे साधनेच्या फालाश्रुतीकडे चातकासारखे डोळे लावून बसण्यात काही अर्थ नाही. साधकाचे प्रथम कर्तव्य आहे ते म्हणजे क्रियायुक्त होते. आपली साधना जास्तीत-जास्त चांगली कशी करता येईल एवढेच त्याच्या हातात आहे. त्या साधनेचे फळ नक्की काय आहे, ते त्याला या जन्मी मिळणार की नंतर कधीतरी मिळणार वगैरे वगैरे तात्विक प्रश्नांची उकल त्याच्या आवाक्याबाहेरची आहे. त्याच्या आवाक्यात काय आहे तर साधनारत रहाणे. योगसाधना युक्त होऊन साधनेत घालवलेला प्रत्येक क्षण कसा मनमुराद उपभोगता येईल ते पाहाणे. जर साधक असा प्रकारे योगक्रियायुक्त राहील तर एक ना एक दिवस त्याला सफलता मिळणारच यात शंका नाही.

वरील श्लोकाद्वारे प्राचीन योगी पुस्तकी वाचनाची मर्यादाही स्पष्ट करतात. पुस्तकी वाचन योगमार्गाची जुजबी ओळख करून देऊ शकेल परंतु पुस्तके वाचून योगसिद्धी अर्थात योगमार्गात सफलता कदापि मिळणार नाही. कुंडलिनी योग आणि हठयोग या विषयांचे जे प्राचीन साहित्य आहे त्याचे एक वैशिष्ठ्य आहे. त्या मध्ये प्रामुख्याने क्रियात्मक योगसाधनांचे विश्लेषण केलेले आहे. तत्वज्ञान चघळण्यापेक्षा साधनात्मक विवेचन त्यांत अधिक प्रमाणात आहे. एक सोपे उदाहरण घेऊ. अजपा साधना केल्याने श्वासोच्छ्वास मंद-मंद होऊन एक दिवस केवल कुंभक साधतो असं नुसतं वाचून किंवा ऐकून काही साधकाला केवल कुंभक साधणार नाही. त्यासाठी त्याला प्रत्यक्ष अजपा साधना अंगीकारावी लागेल. नुसती अंगीकारूनही चालणार नाही तर "अजपा युक्त" व्हावे लागेल. पुस्तकी वाचनाची ही मर्यादा योगसाधकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. पुस्तकी वाचनाने साधकाचा विज्ञानमय कोष सुखावतो. काही काळ आपल्याला सर्व "समजले" असा आभास त्याला होतो परंतु अनुभूतीच्या अभावी ही "ज्ञान" प्राप्ती अल्पजीवी ठरते. या उलट योगक्रियायुक्त झाल्याने मिळणारे ज्ञान आणि आनंद साधक दररोज प्रत्यक्ष चाखू शकतो.

क्रिया युक्त होण्याचे महत्व अधिक ठसठशीत पणे मांडण्यासाठी पुढे म्हणतात -

न वेषधारणं सिद्धेः कारणं न च तत्कथा।
क्रियैव कारणं सिद्धेः सत्यमेतन्न संशयः॥

केवळ बाह्य वेशभूषा धारण केल्याने योगशास्त्रात सिद्धी मिळत नाही. शास्त्रार्था विषयी पोकळ बोल बोलून योगशास्त्रात सिद्धी मिळत नाही. योगमार्गावर सिद्धी अर्थात सफलता मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे क्रिया अर्थात योगसाधना.

वरील सर्व विवेचनावरून लक्षात आलंच असेल की साधकाने साधनेचे फळ मिळेल की नाही, कधी मिळेल वगैरे गोष्टींपेक्षा साधना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशी करता येईल, साधनेतून जास्तीत जास्त आनंद आणि समाधान कसे मिळवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. साधनेची फलश्रुती साधकाच्या हातात नाही परंतु साधना चांगल्या प्रकारे करणे नक्कीच त्याच्या हाती आहे आणि तेच त्याचे प्रथम कर्तव्य आहे.

असो.

साधक, साधना आणि सिद्धी हा अद्भुत खेळ ज्या जगदंबा कुंडलिनीच्या साक्षीने मांडला जातो ती आदिशक्ती योगाभ्यासी वाचकांना योगमार्गावर अग्रेसर करो करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 25 May 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates