त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं

त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं

आज गणेश चतुर्थी. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे गणपति. आज जरी गणेश उपासना प्रामुख्याने भक्तिमार्गाने केली जात असली तरी प्राचीन काळापासून गणपति आणि कुंडलिनी योग यांचा घनिष्ठ संबंध असलेला आपल्याला पहायला मिळतो. कुंडलिनी योगशास्त्राप्रमाणे समस्त ब्रह्मांड मानवी शरीरातच विद्यमान आहे. त्याचप्रमाणे सर्व देवी-देवताही शरीरातच स्थानापन्न आहेत. श्रीगजाननाचे मानवी देहातील स्थान म्हणजे मूलाधार चक्र. याच अर्थाने गणपति अथर्वशीर्षामध्ये "त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं" असे म्हटले आहे. आजच्या गणेश चतुर्थी निमित्त आपल्या लाडक्या गणपतीचे हे निवासस्थान कसे आहे ते विचारात घेऊया...

तसं पाहायला गेलं तर शरीरस्थ चक्रांचे वर्णन अनेक प्राचीन योगाग्रंथांत आढळते. उदाहरणार्थ शिवसंहिता, घेरंड संहिता, षटचक्र निरूपण, योगचूडामणी उपनिषद, योगशिखा उपनिषद, सिद्ध-सिद्धान्त पद्धती या ग्रंथांत मूलाधार चक्राचे विवरण आढळते. मूलाधार चक्राचे बाह्य शरीरावरील स्थान आहे शिवण स्थान. मूत्रद्वार आणि मलद्वार यांना जोडणारी व शिवल्यासारखी दिसणारी जी जागा असते त्याला शिवण स्थान असे म्हणतात. येथेच मूलाधाराचा बाह्य केंद्रबिन्दु आहे. परंतु प्रत्यक्ष मूलाधार चक्र त्वचेवर नसून शिवण स्थानाच्या दोन बोट आत वरच्या बाजूस आहे.

मूलाधार चक्राला चार पाकळ्या किंवा दले आहेत. स्थूल शरीरात ही दले म्हणजे ज्ञानतंतु असून सूक्ष्म शरीरात ती ध्वनि कंपने (sound vibrations) आहेत. वं, शं, षं आणि सं अशी चार ध्वनि कंपने येथे सांगितली आहेत. या कंपनांचा एक योगागर्भ अर्थ आहे. विस्तार भयास्तव तो येथे देत नाही परंतु सर्वसाधारण साधकाच्या दृष्टीने लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे सूक्ष्मशरीराची उत्पत्ति "नादापासून" झालेली आहे.

मूलाधार चक्र पृथ्वीतत्वाचे प्रमुख स्थान आहे. शरीरात मल (पृथ्वीतत्व) उत्सर्जन करण्याची इंद्रिये येथेच आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. पृथ्वीतत्वाचे बीजाक्षर - लं - हेच मूलाधाराचा बीजमंत्र आहे. पृथ्वी तत्वाची आणि मूलाधार चक्राची शुद्धी करण्यासाठी हाच मंत्र सांगितला जातो. श्रीगणेशाला पृथ्वीतत्वाची देवता मानतात ते याच कारणाने. किंबहुना गणेशाचे तुंदिलतनु स्वरूप म्हणजे जड पृथ्वीतत्वाचेच प्रतीक आहे.

अशा या मूलाधार चक्राचा रंग "रक्तवर्ण" आहे. याचा अर्थ असा की येथे रजोगुणाचे आधिक्य आहे. प्रत्येक शुभकार्याचा आरंभ करताना गणेशाला वंदन करतात ते याचसाठी. कोणतेही कार्य जेव्हा काही इच्छा धरून केले जाते तेव्हा ते रजोगुणीच ठरते आणि पृथ्वीतत्वाच्या स्थूल शरीरानेच ते संपन्न केले जाते. पर्यायाने मूलाधाराचे आणि गजाननाचे आशीर्वाद आवश्यक ठरतात. याच ठिकाणी "क्रियाशक्ती" चे अधिष्ठान मानले गेले आहे. मूलाधारातच निद्रिस्त कुंडलिनी प्रणवरूपी "साडेतीन वेटोळे" घालून बसली आहे.  श्रीगणेशाला ओंकाऱ स्वरूप मानले आहे ते या अर्थाने.

वरील सर्व विवेचनावरून तुम्हाला गणेशाचे योगगर्भ स्वरूप नीट कळू शकेल.

श्रीगणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मूलाधार स्थित श्रीगजानन तुम्हा सर्वांना अभिष्ट प्रदान करो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.

 


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 29 Aug 2014


Tags : योग अध्यात्म भक्ती

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates