Untitled 1

नव्याची नवलाई आणि जुनं ते सोनं

वर्ष २०१९ संपत आलं आहे. काळाच्या अथांग सागरात नगण्य ठरणारं वर्ष मानवासाठी मात्र काही ना काही चांगल्या-वाईट आठवणी देऊन जात असतं. जाणाऱ्या वर्षाच्या झरोक्यातून हजारो वर्षांचा इतिहास असलेलं भारतीय योगशास्त्राकडे पाहिल्यास एक अद्भुत "कोलाज" बनलेलं दिसेल. किती एक योग्यांनी आजवर हे कोलाज सजवलय, त्यात अमुल्य भर टाकून ते वाढवलय. आज योग ज्या स्वरूपात आपल्याप्रत पोहोचला आहे तो या सर्व मातब्बरांच्या मेहनतीमुळेच.

जर सत्य-त्रेता-द्वापर-कलि अशा युगांच्या चौकडीचा विचार केला तर सर्वसाधारणपणे सत्ययुगीन काळ हा आध्यात्मिक परमोत्कर्षाचा काळ मानला जातो. त्या काळी ज्ञान देण्याची गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती. एक गुरु मोजक्या शिष्यांना ज्ञान प्रदान करत असे. ह्या ज्ञानात भौतिक आयुष्याला आवश्यक ज्ञान आणि अध्यात्म ज्ञान अशा दोहोंचा समावेश असे. हळूहळू काळ बदलू लागला. अध्यात्म मार्गात अनेकानेक परंपरा आणि पंथ उदयास आले. त्या पंथांची स्वतःची अशी विचारधारा आणि साधानाप्रणाली अस्तित्वात आली. संन्यासाश्रमाचे एक नवीन स्वरूप दशनाम संन्यास परंपरेद्वारे रुजले गेले. त्या जोडीला बैरागी, भटके जोगी, कानफाटे जोगी, अघोरी साधू वगैरे अनेक साधकांचे प्रकार उदयास आले. आजच्या सर्वसामान्य शहरी योगसाधकाचा विचार केला तर तो ह्यांपैकी कोणत्याच श्रेणीत बसणार नाही. त्याला आज योगज्ञान मिळतंय ते "योगा इंस्टीट्युटस" कडून आणि पंचतारांकित आश्रमांकडून.

जुन्या काळी ज्ञान देण्याचं साधन म्हणजे गुरुचा शिष्याशी थेट परस्पर संवाद. अन्य मार्ग नाही. नंतरच्या काळात जेंव्हा ज्ञान शब्दबद्ध करून ठेवण्याची कला विकसित झाली तेंव्हाचे ग्रंथ हे सुद्धा गुरु-शिष्य संवाद आणि निरुपण अशाच प्रकारचे आहेत असं आपल्याला आढळून येईल. उपनिषदे असोत किंवा वेगवेगळ्या "गीता" असोत किंवा मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथ संवाद असो हे सर्व योगसाहित्य गुरु-शिष्य संवादावरच आधारलेले आहे. आज आपल्याकडे ज्ञान प्रदान करण्याचे आणि जतन करण्याचे अक्षरशः खंडीभर मार्ग उपलब्ध आहेत. गुळगुळीत शुभ्र कागदावरील "फोर कलर" मधील छापील पुस्तके, दृकश्राव्य माध्यमे, पंचतारांकित हॉटेलांत होणारे सेमिनार्स आणि चर्चासत्रे, इंटरनेट वरील अफाट माहिती अशा सगळ्याच माध्यमांत आज क्रांतिकारी बदल झालेले आपल्याला दिसत आहेत.

प्राचीन काळच्या योगशिक्षणात गोपनीयता आणि प्रात्रापात्राता पाहून साधानाक्रीयांची शिकवण ह्या अत्यंत महत्वाच्या बाब होत्या. कुंडलिनी योगातील गुढगम्य योगक्रिया ह्या फक्त गुरु-शिष्य जोडगोळी पुरत्याच मर्यादित असत. अनेक योगग्रंथांत भगवान शिव माता पार्वतीला सांगतात की हे देवी स्वतःचं लज्जारक्षण करतेस त्याचप्रमाणे मी देत असलेलं ज्ञानही रक्षून ठेव. कोणापुढे प्रकट करू नको. नंतरच्या काळातील योगग्रंथांतही हे तत्व पाळले गेले असले तरी यांतील गोपनीयता हळूहळू काही अंशी कमी होऊ लागली. अनेक हठ्ग्रंथ किंवा अगदी श्वेताश्वतर उपनिषदा सारख्या रचनांमध्ये हे गोपनीय अनुभवांचे आंशिक प्रकटीकरण आपल्याला जाणवते. जुन्याकाळचे योगग्रंथ प्रामुख्याने त्या-त्या परंपरांतील साधकांसाठी उपलब्ध असत. आज स्थिती अशी आहे की कोणताही योगग्रंथ कोणालाही सर्रास उपलब्ध आहे. काळानुसार साधानाक्रीयांची गोपनीयता हा प्रकार बराच कमी झाला आहे. एके काळी परम गोपनीय मानला गेलेला कुंडलिनी योग आज अक्षरशः साधक-बाधक विचारही करू न शकणाऱ्या साधकांना अगदी विनासायास उपलब्ध झालेला आहे.

वरील सर्व गोष्टींत झालेले हे कालसापेक्ष बदल चांगले आहेत की वाईट आहेत हा मुद्दा या लेखाच्या दृष्टीने तसा गौण आहे. महत्वाचं काय आहे तर त्यांतील "व्यस्त" प्रमाणावर आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणे. जुन्या काळी गुरु, ग्रंथ आणि ज्ञानाचे प्रगटीकरण अत्यल्प होते परंतु त्यांद्वारे निर्माण होणारे साधक उत्तम प्रकारचे होते. आज गुरु, ग्रंथ आणि ज्ञान हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत परंतु त्यांद्वारे तयार होणाऱ्या साधकांची अवस्था घसरली आहे. यांत कोणाची हेतुतः चूक आहे असं नाही तर एकूणच योगमार्गाची घसरण झालेली आहे. आधुनिक भोगवादी जीवनशैलीचा रेटा, भरमसाठ वाढलेल्या आर्थिक गरजा, पाश्चात्त्यांचा प्रभाव, ढासळलेले पर्यावरण, विवेक आणि वैराग्याचा अभाव अशी अनेकानेक कारणे सापडतील. या कारणांवर नुसती पोकळ चर्चा करून काही होणारे नाही. साधकाच्या मनात जोवर श्रद्धा-सबुरी-शिस्त-समर्पण ही चतुःसूत्री घट्ट रुजत नाही तोवर त्याला यांवर मात करण्याची प्रेरणा मिळणे कठीण आहे. या कालसापेक्ष बदलांवर नाक मुरडण्यापेक्षा मार्ग कसा काढता येईल याचा विचार प्रत्येक साधकाने करणे अगत्याचे आहे. "नव्याची नवलाई" आणि "जुनं ते सोनं" यांतील सुवर्णमध्य साधणे साधकासाठी आवश्यक आहे.

असो.

वर्ष २०२० सर्व योगाभ्यासी वाचकांना कुंडलिनी योगमार्गावर अग्रेसर करणारे ठरो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 30 December 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates