Untitled 1

श्री कुल, काली कुल आणि कुलेश्वरी

आगामी नवरात्रीचे औचित्य साधून आपण गेले काही आठवडे शक्ती उपासने विषयी जाणून घेत आहोत. शक्ती उपासनेचे एक लोकप्रिय स्वरूप म्हणजे दशमहाविद्या. देवीची दहा स्वरूपे अर्थात काली, तारा, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, त्रिपुर भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी, आणि कमला म्हणजेच दशमहाविद्या. यांची उपासना ही सामान्य विद्या नाही तर "महा" विद्या आहे. ही दहा देवी स्वरूपे भोग आणि मोक्ष देण्यास सक्षम आहेत.

या दहा देवी स्वरूपाची विभागणी प्राचीन काळच्या जाणकारांनी दोन गटांत केलेली आहे - श्रीकुल आणि काली कुल. श्रीकुलात प्रामुख्याने सौम्य गुणधर्माची देवी स्वरूपे येतात. उदाहरणार्थ, त्रिपुर सुंदरी आणि कमला ही देवी स्वरूपे त्यांच्या सौम्य स्वभावामुळे आणि सुख-समृद्धी-भोग इत्यादी प्रदान करण्याच्या स्वभावामुळे श्रीकुलात गणली जातात. या उलट काली कुळात गुणधर्माने उग्र देवी स्वरूपे येतात. उदाहरणार्थ, महाकाली आणि छिन्नमस्ता ही अत्युग्र देवी स्वरूपे काली कुलात मोडतात. येथे मी मुद्दामच श्री कुल आणि काली कुल यांच्या सखोल वर्गीकरणात जात नाही कारण तो आजचा विषय नाही. येथे दशमहाविद्यांचे या दोन कुलांत वर्गीकरणात केले गेले आहे इतपत माहिती पुरेशी आहे.

आता गंमत बघा. दशमहाविद्यांचे स्वतःचे असे विशिष्ठ गुणधर्म आहेत. उदाहरणार्थ, कमला ही प्रामुख्याने सुख-संपत्ती प्रदान करणारी मानली गेले आहे तर महाकाली ही प्रामुख्याने गोपनीय विद्यांची आणि उग्र कर्मांची स्वामिनी मानली गेली आहे. मानवी आयुष्याची मर्यादा लक्षात घेता ही सर्व देवी स्वरूपे स्वतंत्रपणे प्रसन्न करून घेणे अशक्यप्राय नसले तरी अत्यंत अवघड आहे. यांतील प्रत्येक महाविद्येची उपासना ही खरंतर आयुष्यभराची साधना आहे. केवळ जपमाळ घेऊन त्यावर या देवी स्वरूपाचे मंत्र पुटपुटणे एवढा काही तो सोप्पा प्रकार नाही.

जर तुम्ही या दशमहाविद्यांची स्तोत्रे, स्तवन, सहस्रनाम वगैरे रचनांचा अभ्यास केलात तर तुम्हाला असे आढळून येईल की या सर्वच देवी स्वरूपांचे कुल-कुंडलिनीशी एकरूपत्व प्रतिपादित करण्यात आलेले आहे. याचा अर्थ असा की दशमहाविद्यांना जोडणारा एक समान दुवा आहे. तो दुवा म्हणजेच कुल-कुंडलिनी. वर दिलेले उदाहरणच परत घेऊ. जर कमला कुल-कुंडलिनी स्वरूपा आहे आणि महाकाली सुद्धा कुल-कुंडलिनी स्वरूपा आहे तर कुल-कुंडलिनीत कमला आणि महाकाली या दोन्ही देवतांचे गुणधर्म समाविष्ट असणार हे उघड आहे. हाच प्रकार अन्य महाविद्यांच्या बाबतीतही आहे. तात्पर्य हे की एक कुल-कुंडलिनीची उपासना केल्याने सर्ब देवी स्वरूपाची उपासना केल्याचे फळ मिळवता येते. किंबहुना कुल-कुंडलिनीची उपासना ही सर्व देवी स्वरूपाची एकत्रित उपासनाच आहे.

कुंडलिनी ही शक्ती असल्याने योगशास्त्रात तिला देवी स्वरूपा मानलेले आहे. अनेकानेक नावांनी तिची स्तुती करण्यात आलेली आहे. कुंडलिनीचे एक नाव आहे "कुलेश्वरी". कुल या शब्दाला कुंडलिनी योगशास्त्रात फार खोल अर्थ आहे. विस्तारभायास्वत येथे फार खोलात जात नाही परंतु समस्त कुलाची स्वामिनी म्हणजे कुल-कुंडलिनी शक्ती. साधकाला पदोपदी सहाय्यभूत ठरणारी, त्याला त्याच्या पात्रतेनुसार ऋद्धी-सिद्धी प्रदान करणारी, त्याचा योगाभ्यास सफल बनवणारी आणि शेवटी त्याला शिवपदी घेऊन जाणारी अशी ही कुल-कुंडलिनी देवी.

आता प्रश्न असा की कुल-कुंडलिनीची उपासना नक्की कशी करायची. जर तुम्ही श्री कुलातील आणि काली कुलातील देवतांच्या उपासना पद्धती बघितल्यात तर तुम्हाला असे आढळेल की शास्त्र ग्रंथांत त्यांविषयी भरभरून लिहिलेले आहे. अनेक जाणकार उपासकांनी या देवतांची कर्मकांडात्मक उपासना परंपरेने आजही चालू ठेवलेली आहे. कुल-कुंडलिनी देवीची गोष्ट मात्र काहीशी वेगळी आहे. मागे मी सांगितलं होतं की कुल-कुंडलिनीची उपासना मंत्रमय आणि योगमय अशा दोन मार्गांनी करता येते. गंमत अशी की कुल-कुंडलिनीची योगमय उपासना योगग्रंथांत भरभरून आलेली आहे परंतु कुल-कुंडलिनीची मंत्रमय उपासना मात्र त्यामानाने अत्यंत त्रोटक स्वरूपात उपलब्ध आहे. मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथ इत्यादी सिद्धांनी योगमय विषयी विस्ताराने लिहिलेले आहे. योग उपनिषदांत सुद्धा कुल-कुंडलिनीची योगगम्य उपासना विस्ताराने आलेली आहे. 

शास्त्रग्रंथांत विषद केलेला कुंडलिनी योग हा प्रामुखाने क्रियात्मक आहे. आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा, लय, ध्यान इत्यादी गोष्टींचे विवरण त्यांत आहे. परंतु या योगक्रीयांद्वारे कुल-कुंडलिनीची उपासना नेमकी कशी करायची याबाबत मात्र कोठेही सखोल विवेचन नाही. अजपा साधनेचेच उदाहरण घेऊ. अजपा ध्यानाची क्रियात्मक अवस्था जरी योगग्रंथांत सांगितली असली तरी त्यांद्वारे कुल-कुंडलिनीची उपासना कशी साधायची किंवा योगमय उपासना मंत्रमय उपासनेशी कशी जोडायची हा योगगम्य विषय आहे. एक तर साधक म्हणून तुम्हाला हे उत्तर शोधावे लागते नाहीतर कोणा अनुभवी जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे अभ्यासरत राहून त्या संबंधीचे ज्ञान मिळवावे लागते. बऱ्याच वर्षांचा हा प्रवास असतो. एक-दोन महिन्यांत किंवा काही वर्षांत साधणारी ही गोष्ट नाही.

असो.

मानव पिंडात प्रत्यक्ष परमेश्वराने कुल-कुंडलिनी देवीची प्राणप्रतिष्ठा विधिवत केलेली आहे. ती जगदंबा सर्व अभ्यासू वाचकांना योग्य मार्ग दाखवो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 12 October 2020