Untitled 1

अगस्ती आणि लोपामुद्रा

वैदिक ऋषींपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे अगस्ती. परम तपस्वी आणि योगी. नेहमी तपस्येत आणि योगसाधनेत मग्न असणाऱ्या अगस्ती ऋषींना संसारात रस नव्हता. एकदा त्यांना स्वप्नात त्यांच्या पितरांचे दर्शन झाले. त्यांच्या पितराना एका खोल खड्ड्यात उलटे टांगले होते आणि ते यातना भोगत होते. अगस्ती ऋषींनी त्यांना त्यामागचे कारण विचारले. त्यांचे पितर म्हणाले - "तू विवाह न केल्याने आपल्या कुळाचा विस्तार थांबला आहे आणि त्यामुळे आमची अशी दुर्दशा झाली आहे. तू जर विवाह करून संतान उत्पन्न करशील तरच आमची सुटका होईल."

आपल्या पितरांच्या मुक्तीखातर अगस्ती ऋषींनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याना मनाजोगी सर्वगुण संपन्न विवाहयोग्य कन्या मिळेना. तेंव्हा त्यांनी आपल्या योगबलाने एका सर्वगुण संपन्न बालिकेची रचना केली. योगायोगाने त्याचवेळेस विदर्भ देशाचा राजा अपत्य प्राप्तीसाठी यज्ञ करत होता. अगस्त्य ऋषींनी रचना केलेली कन्या त्या राजाच्या पोटी जन्माला घातली. त्या कन्येचे नाव "लोपामुद्रा".

यथावकाश लोपामुद्रा विवाह योग्य झाली. अगस्त्य ऋषींनी राजाकडे तिच्यासाठी याचना केली. राजाने लोपामुद्रा आणि अगस्ती ऋषी यांचा विवाह लावून दिला. लग्नानंतर अगस्ती आणि लोपामुद्रा यांच्या मिलनाची वेळ येऊन ठेपली. लोपामुद्रा अगस्ती ऋषींना म्हणाली - "पती आणि पत्नी यांचे संसारात सारखे महत्व असते. मी राजकन्या आहे. मला आभूषणे, भरजरी वस्त्रे, मखमली शय्या इत्यादींची सवय आहे. तुम्ही तर वल्कले परिधान केलेली आहात. तुम्ही आधी माझ्यासारखे व्हा आणि मग आपले मिलन होऊ दे."

अगस्ती ऋषींसमोर मोठा पेच उभा राहिला. ते तर तपस्वी आणि पत्नी पडली राजकन्या. पत्नीची इच्छा पूर्ण तरी कशी करणार. लोपामुद्राने आपला हट्ट सोडला नाही. शेवटी नाईलाजाने अगस्त्य ऋषी धन मिळवण्यासाठी आश्रमाबाहेर पडले. पुढे अजूनही काही घटना प्रसंग घडल्यावर त्यांनी योगबलाने इल्वल नामक दैत्य कुळातील राजाचा पराभव केला आणि त्याच्याकडून आवश्यक ते धन प्राप्त केले.

धन प्राप्त केल्यावर ते आपल्या आश्रमात परत आले आणि लोपामुद्रेला म्हणाले - "मी तुझ्या इच्छेनुसार धन घेऊन आलो आहे. आता तुझ्या संमतीने आपले मिलन होऊ दे." लोपामुद्रेने होकार दिला. कालांतराने लोपामुद्रेने "दृढस्यु" नावाच्या पुत्राला जन्म दिला. गृहस्थाश्रमातील कर्तव्ये पार पाडून आपल्या पितरांना दिलेले वचन पूर्ण केल्यावर अगस्ती ऋषी आणि लोपामुद्रा पुन्हा आपापल्या साधना-तपस्येत मग्न होऊन मोक्ष मार्गाची वाटचाल करू लागले.

अगस्ती ऋषीं आणि लोपामुद्रे विषयी एवढे पाल्हाळ लावण्याचे कारण आहे. लोपामुद्रेचे पिता भगवती त्रिपुरा सुंदरीच्या "भगमालिनी" स्वरूपाचे उपासक होते असं म्हटलं जातं. साहजिकच लहानपणा पासून लोपामुद्रेला सुद्धा श्रीविद्या उपासनेचे बाळकडू मिळाले होते. भगमालिनी देवीने स्वतः तिला श्रीललिता त्रिपुर सुंदरीच्या उपासनेचा उपदेश दिला होता. लोपामुद्रा एक उच्च कोटीची श्रीविद्या उपासक आणि आचार्य होती. श्रीविद्येच्या दिग्गज उपासाकांमध्ये तिचे नाव घेतले जाते. भगवान शिव, अवधूत दत्तात्रेय, परशुराम, कुबेर, इंद्र, लोपामुद्रा, अगस्ती पासून ते आदी शंकराचार्यांपर्यंत सगळ्यांनी श्रीविदयेचा अंगीकार केलेला आहे. अगस्ती ऋषींनी आपल्या पत्नीचा अधिकार पाहून लोपामुद्राकडून श्रीविद्येची दीक्षा घेतली होती. श्रीविद्येचे जे संप्रदाय आहेत त्यांतील एक शाखा लोपामुद्रेच्या नावाने ओळखली जाते.

येथे एक सांगायला हवे की वरील इतिहास हा वेगवेगळ्या ग्रंथांत थोड्याफार फरकाने आलेला आहे. येथे मी ढोबळमानाने सारांश तेवढा दिला आहे. हे सगळं सांगण्याचे कारण असे की श्रीविद्या अर्थात त्रिपुर सुंदरीची उपासना प्रामुख्याने सात्विक आणि राजसिक असल्याने सर्वांसाठी उत्तम आहे. ही उपासना मंत्रमय मार्गाने आणि योगमय मार्गाने अशी दोन्ही प्रकारे करता येऊ शकते. दोन्ही प्रकारांत भक्ती  आणि श्रद्धा अर्थातच अत्यावश्यक आहेत. श्रीविद्या उपासना ही एक उच्च कोटीची उपासना तर आहेच परंतु एक अत्यंत विस्तृत, सूक्ष्म आणि प्रगत असे अध्यात्म शास्त्र आहे. त्यांत अनेक टप्पे आहेत, अनेक पायऱ्या आहेत. शरीरस्थ कुंडलिनी आणि त्रिपुर सुंदरी एकाच शक्तीची दोन रूपे आहेत. "ह" कार, "स" कार आणि त्यांच्या पलीकडला "ॐ" कार यांची अनुभूती त्यांच मार्गावरील एक महत्वाचा योगगम्य भाग आहे. आगामी नवरात्रीच्या पर्वात अजपा कुंडलिनी योगाच्या सहाय्याने जगदंबेची उपासना करण्याची प्रेरणा तुम्हा सर्वाना होईल अशी आशा आहे.

असो.

श्रीविद्या असो अथवा दशमहाविद्या असो अथवा हठविद्या असो, जगदंबा कुंडलिनी सर्व उपासनांचा मुलभूत पाया आहे. सर्व अभ्यासू वाचकांना कुंडलिनीची कृपा प्राप्त होवो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 05 October 2020