Untitled 1

गणेश जन्माची कथा आणि तिचा गूढ अर्थ

गणपतीच्या जन्माची कथा ठावूक नाही असा व्यक्ती निदान महाराष्ट्रात तरी सापडणे कठीण. पण कितीजणांना त्या कथेचा गर्भितार्थ माहीत आहे? आधुनिक काळात तर असे महाभाग आढळतात की जे या कथेची टिंगल करत काहीतरी प्रश्न उपस्थित करतात की शंकराने हिंसाच का केली? एवढ्याशा लहान बालकाच्या धडावर हत्तीचे डोके बसलेच कसे? पार्वतीने मळापासून मुलगा बनवला मग ती काय एवढी अस्वच्छ रहात होती? असे अनेक प्रश्न हे टवाळखोर उपस्थित करत असतात. या बिचार्‍यांना हे ठावूकच नसते की पुराणांची रचना करणार्‍यांनी 'गोष्टींतून ज्ञान' हे तत्व लक्षात ठेवून या कथा सांगितल्या आहेत. जर एकादी गोष्ट समजली नाही तर निदान तीची टिंगल तरी करू नये. आपले 'अगाध' ज्ञान पाजळण्यापेक्षा जर ते एखाद्या गुरूला नम्रपणे शरण जाऊन त्याला या विषयी विचारतील तर ते जास्त हितकारक ठरेल. असो.

गणेश जन्माच्या कथेचा गूढ अर्थ पाहण्यापूर्वी ती कथा थोडक्यात पाहू...

एकदा पार्वती एकांतात असताना विचार करत होती की सर्व गण हे शंकराचेच आहेत. ते सर्व जरी आपली आज्ञा पाळत असले तरी आपला स्वतःचा म्हणावा असा एकही गण नाही. मग तीने एकदा स्नानाला बसलेली असतांना आपल्या मळापासून एक पुत्र बनविला. तोच गणेश. जन्माला आल्याबरोबर गणपतीने 'मला काहीतरी काम दे' असा घोषा पार्वती मातेकडे लावला. तेव्हा पार्वतीने गणेशाला आपले स्नान होईपर्यंत कोणाला आत येऊ देवू नको असे सांगितले. मातेची आज्ञा पाळत गणेश प्रासादाच्या प्रवेशद्वारावर तैनात झाला.

काही काळाने शंकर घरी परतला. गणेशाने अर्थातच त्याला ओळखले नाही. शंकर आत जाण्याचा प्रयत्न करू लागताच गणेशाने त्याच्याशी तुंबळ युद्ध आरंभले व शेवटी बाळ गणेशाचे शीर धडावेगळे केले. पार्वतीला जेव्हा हे कळले तेव्हा तीने टाहो फोडला. शंकरालाही आपली चूक समजली. त्याने आपल्या गणांना आज्ञा केली की जो कोणी पहीला सजीव दिसेल त्याचे शिर कापून गणेशाच्या धडाला बसवावे. शिवगणांना प्रथम एक हत्ती दिसला आणि शिव आज्ञेप्रमाणे त्यांनी त्याचे शिर कापून गणेशाच्या धडाला चिकटवले. 

या कथेचा गूढ अर्थ काय बरे? पार्वती म्हणजे आदीशक्ती. योगशास्त्रात पुरुष (वा ब्रह्म म्हणा) आणि प्रकृती (वा माया म्हणा) हे जोडपे प्रसिद्धच आहे. सृष्टीक्रमानूसार प्रकृतीच या विश्वाला जन्म देते. प्रकृतीपासूनच मन, बुद्धी, अहंकार, आकाश, वायू, अग्नि, जल आणि पृथ्वी ही तत्वे निर्माण होतात. याचाच अर्थ असा की पृथ्वीतत्व हे सृष्टीक्रमातील सर्वात शेवटचे तत्व आहे. तेव्हा पार्वतीचा 'मळ' म्हणजे हे पृथ्वीतत्व. अगदी स्थूल अर्थानेसुद्धा मळ हा माती अर्थात पृथ्वीतत्वच आहे.

गणेशाला पावर्तीमातेने एकटीनेच जन्माला घातले. साधारणतः अपत्य हे पुरुष व स्त्री या दोघांच्या संकरातून जन्माला येत असते. येथे तसे नाही. शिवतत्व हे निराकार, निर्ग़ूण व निश्चल असल्याने ते सृजनात सहभागी होत नाही. मायाच शिवतत्वाच्या आधाराने ही सृष्टी रचते.

गणपतीला पृथ्वीतत्वाचे स्वामित्व देण्यात आले आहे ते याच मुळे. पृथ्वीतत्व हे जड आहे. त्याचा जड पणा दर्शवण्यासाठी हत्ती हे रूपक वापरण्यात आले आहे. हत्ती पाहील्याबरोबर मनात जडपणा हा भाव येतो की नाही हे प्रत्येकाने आपल्याशीच तपासून पहावे. अजून एक गोष्ट. कुंडलिनी योगशास्त्रात गणपतीला मुलाधारचक्राची देवता मानण्यात आले आहे. अर्थर्वशीर्षातले 'मुलाधारं स्थितोसी नित्यम्' हे तुम्हाला माहीतच असेल. मूलाधार चक्रामधे पृथ्वीतत्वाची अभिव्यक्ती आढळते आणि त्याचे चिन्ह हेही हत्तीच आहे.

गणेशाने शंकराला घरात जाण्यापासून रोखले. जर शंकर त्यावेळी घरात घुसला असता तर त्याला पार्वती वस्त्रहीन दिसली असती. पार्वती वस्त्रहीन म्हणजे काय?  आदीशक्ती ही नेहमी तम, रज आणि सत्व या त्रिगुणांचे वस्त्र लेवून असते. आदीशक्ती जेव्हा या त्रिगुणात्मक वस्त्रांतून मोकळी होते तेव्हा त्या स्थितीला योगशास्त्रात 'अव्यक्त' असे म्हणतात. आदीशक्ती सहजासहजी कोणाला ही अव्य्क्तावस्था प्राप्त होवू देत नाही. आदीमाया जगातल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या मायाजालात गुरफटवून ठेवते. अर्थात तीला 'वस्त्रहीन' स्वरूपात कोणीही पाहू शकत नाही. जगातली बहुतांशी मायास्वरूपे पृथ्वीतत्वाच्या सहाय्यानेच प्रगट होताना आढळतात. तेव्हा गणेश (पृथ्वीतत्व) शंकराला रोखतो हे योग्यच आहे. शंकर हा परमात्म्याचे प्रतीक आहे. बाकीचे जग 'पुरुष' तर शंकर 'पुरुषोत्तम' आहे. म्हणूनच शंकर गणेशाचा वध करू शकला आणि नंतर त्याला जीवंतही करू शकला. हे स्वामीत्व केवळ परमेश्वराकडेच असू शकते. 

आशा आहे की गणेशजन्माच्या कथेचा खरा अर्थ तुम्हाला कळला असेल. हा अर्थ मनात ठेवून तुम्ही हा गणेशोत्सव साजरा करावा हीच शिवचरणी प्रार्थना. 


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 23 Aug 2009


Tags : योग अध्यात्म शिव कुंडलिनी चक्रे शक्ती कथा भक्ती विचार

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates