Ajapa Yoga : Mantra, Pranayama, Hand Mudras and Meditation for Kundalini Awakening by Bipin Joshi. Read more...
Untitled 1

योग: कर्मसु कौशलम्

योग म्हटलं की प्रथमतः आठवते ती महर्षी पतंजलींची व्याख्या - योगश्चित्तवृत्तिनिरोधः

योगशास्त्राचा क्रियात्मक अभ्यास करत असतांना किंवा ध्यान-धारणेचा सराव करत असतांना योगाची ही थेट ही व्याख्या चपलख बसते. महर्षी पतंजलींची योगसूत्रे ही गुरुच्या देखरेखेखाली साधना करत असणार्या योगाभ्यासी साधकाला डोळ्यासमोर ठेऊन केलेली आहे. योगशास्त्राची थोड्या वेगळ्या अंगाने केलेली व्याख्या आपल्याला भगवत गीतेत आढळते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात - योग: कर्मसु कौशलम्

श्रीकृष्णाने केलेल्या योगाच्या व्याख्येनुसार कर्म कौशल्याने करणे म्हणजे योग. ही व्याख्या वरकरणी मूळ विषयापासून काहीशी अलिप्त किंवा भरकटलेली वाटेल. परंतु ही व्याख्या योगजीवानाचे सार आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली ही व्याख्या समजण्यासाठी प्रथमतः कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय ते संक्षेपाने माहित असणे आवश्यक आहे.

कर्म म्हणजे स्वधर्मानुसार करावयाची नित्य आणि नैमित्तिक कर्मे. उदाहरणार्थ आपापली नोकरी किंवा व्यवसाय प्रामाणिकपणे करणे हे कर्म आहे. आपल्या कुटुंबाविषयीची आपली जबाबदारी पार पाडणे हे ही कर्म आहे. कर्माचे आचरण करत असतांना अर्थातच त्याना नीतीनियमांचे आधार असणे आवश्यक आहे. एखादा मनुष्य असे म्हणाला की चोरी करणे हे त्याच्या उपजीविकेचे साधन आहे आणि त्यामुळे ते ते त्याचे कर्म आहे तर ते बरोबर ठरणार नाही. विकर्म म्हणजे स्वधार्माविरुद्ध वागून काहीतरी कर्म करणे. उदाहरणार्थ - चोरी, भ्रष्टाचार, स्वैराचार वगैरे. विकार्मांना अर्थातच नीतीनियमांचे पाठबळ असत नाही. अकर्म म्हणजे निष्क्रियता. काही लोकं जबाबदारयांपासून पळ काढण्यात पटाईत असतात. वरकरणी वैराग्याचा किंवा संन्यस्तपणाचा आव आणून विहित कर्मापासून पळ काढणे म्हणजे अकर्म.

आता परत श्रीकृष्णानी सांगितलेल्या व्याख्येकडे वळू. कर्म कुशलतेने करणे हे वरकरणी अगदीच सोपे वाटेल. समजा एखादा इंजिनिअर किंवा डॉक्टर आपल्या कार्यात निष्णात आहे. त्याला योग साधला असे म्हणता येईल का? अर्थातच नाही. तेंव्हा येथे कुशलता या शब्दाने दर्शवलेली प्रक्रिया काही वेगळीच असली पाहिजे जे उघड आहे. मग कुशलता या शब्दाचा येथे अभिप्रेत असलेला अर्थ काय बरे? एक छोटी गोष्ट सांगतो म्हणजे कळून येईल.

ही गोष्ट आहे अवधूत मार्गावरील एका अवतारी सिद्ध पुरुषाची. एकदा हा सत्पुरुष आणि त्याचे काही शिष्य बसले होते. एका शिष्याचा जीव काही ऐहिक गोष्टीत अडकलेला होता. तो आपल्या गुरूला रोज विचारत असे की - माझी इच्छा कधी पूर्ण होईल? आजही त्याने संधी साधून आपल्या गुरूला तोच प्रश्न विचारला - "गुरुजी, माझी इच्छा कधी पूर्ण होईल?". आश्चर्य म्हणजे गुरूने आज पटकन उत्तरही देऊन टाकले - "मी मेल्यावर होईल".

आपल्या गुरुचे उत्तर ऐकून शिष्य पुरता गोंधळून गेला. त्याला तर आपली इच्छा पूर्ण व्हायला हवी होती आणि सद्गुरू तर म्हणत होते - "मी मेल्यावर होईल". म्हणजे आपली इच्छा तर पूर्ण होणार पण आपले सद्गुरू मेल्यावर. या कल्पनेनेच तो कसनुसा झाला. त्याने आपल्या सद्गुरुंचा बराच पिच्छा पुरवला आणि परत परत विचारू लागला. शेवटी त्याचे सद्गुरू हसून म्हणाले - "अरे बाबा, तुझ्यातला 'मी' पणा जेंव्हा जाईल तेंव्हा तुझी इच्छा पूर्ण होईल असं मला म्हणायचं होतं".

किती लाखमोलाची गोष्ट आहे ही! भगवान कृष्णाला अपेक्षित असलेले कौशल्य म्हणजे निष्काम कर्म. निष्काम कर्म करण्यासाठी आवश्यक असते ती समत्वबुद्धी अर्थात कोणत्याही परिस्थितीत विचलित न होणारी बुद्धी. अशी समत्वबुद्धी 'मी' पणावर अवलंबून असते. कारण फळाच्या आशेने हा 'मी' भूललेला असतो. तो समत्वबुद्धी फार काळ टिकू देत नाही.  परिणामी हा 'मी' जोवर आहे तोवर केलेले कोणतेही कर्म कुशलतेने घडत नाही. गंमत म्हणजे जोवर देह आहे तोवर हा 'मी' पूर्णत्वाने टाकताही येत नाही. येथेच योग साधण्याची गुरुकिल्ली दडलेली आहे. कोणतेही कर्म करतांना त्यातील 'मी' पणा काढून टाकला तर त्या कर्माने लिप्तही व्हावे लागत नाही. हे कौशल्य आत्मसात करणे ही महाकठीण गोष्ट. एका दिवसांत, एका वर्षात असे चटकन हे कौशल्य आत्मसात करता येत नाही. अनेक वर्षांचे अथक प्रामाणिक प्रयत्न करावे तेंव्हा कुठे हळू हळू हे कौशल्य अंगी बाणु लागते. पण प्रत्येक साधकाला ही सुरवात कधी ना कधी करावीच लागते. शुभस्य शीघ्रम हे लक्षात ठेवा आणि अग्रेसर व्हा.

आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे तेंव्हा त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

बिपीन जोशी लिखित देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 21 Jun 2016Tags : योग अध्यात्म अष्टांगयोग साधना कथा